सध्या मराठी चित्रपटाला सुगीचे दिवस आले आहेत, असं म्हणायला काहीच हरकत नाही. 'बाईपण भारी देवा' हा मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा बाईपण भारी देवा हा चित्रपट प्रदर्शित होऊन 17 दिवस झाले आहेत, तरीही प्रेक्षकांच्या मनात आणि सिनेमागृहात या चित्रपटाने गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. 17 दिवसात या चित्रपटाने 50 कोटींचा यशस्वी टप्पा पार केला आहे. खास महिलांच्या आयुष्यावर रेखाटण्यात आलेल्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत सहा अभिनेत्रींनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहे. ज्यामध्ये रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), दीपा परब (Deepa Parab), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar), सुकन्या मोने (Sukanya Mone) आणि वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांचा अभिनय पाहायला मिळत आहे. या निमित्ताने चित्रपटाच्या 17 दिवसातील कमाईबद्दल जाणून घेऊयात.
ऑफिस कलेक्शन जाणून घ्या
सॅकनिल्क एंटरटेनमेंटने दिलेल्या माहितीनुसार 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने ओपनिंग डे च्या पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धमाल बॅटिंग सुरू केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 1.05 कोटींची कमाई केली होती. तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात बाईपण भारी देवाने 12.4 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात ही कमाई 24.95 कोटी रुपयांवर पोहोचली. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 17 दिवस झाले आहेत. या 17 दिवसात चित्रपटाने 50.85 कोटी रुपयांची यशस्वी कमाई केली आहे. मराठीतील सैराट आणि वेड या चित्रपटांनंतर 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करण्यात यश मिळवले आहे.
चित्रपटाचे बजेट जाणून घ्या
बाईपण भारी देवा या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. प्रत्येक कुटुंबात केवळ या चित्रपटाची चर्चा ऐकायला मिळत आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट 5 कोटी रुपये आहे. तर 50 कोटींची यशस्वी कमाई करत चित्रपट अजूनही दमदार कामगिरी करत आहे. लवकरच हा चित्रपट वेडच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला मागे टाकेल.