Axis Bank Hikes FD Rate: पैसा एफडीत गुंतवणे हा सर्वांत चांगला पर्याय म्हणून ओळखल्या जातो. कारण, या ठिकाणी रिस्क कमी असते आणि व्याजदर ही चांगला मिळतो. तसेच, तुम्ही गुंतवलेला पैसा तुम्हाला एका ठराविक मुदतीनंतर मिळतो. त्यामुळे लोक जास्त एफडीलाच प्राधान्य देतात. आता Axis बॅंकेने 2 कोटीपेक्षा कमी रकमेसाठी फिक्स्ड डिपाॅझिटच्या व्याजदरावर 15 बीपीएसची वाढ केली आहे. त्यांच्या वेबसाईटवरील माहितीनुसार हा व्याजदर 11 ऑगस्ट 2023 पासून लागू करण्यात आला आहे.
आत्ताच्या सुधारणेनंतर, 7 ते 10 वर्षाच्या मुदतीसाठी अॅक्सिस बॅंक 3.5 टक्के ते 7.20 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. तुम्ही इंटरनेट बॅंकिंग किंवा मोबाईल बॅंकिंगद्वारे फिक्स्ड डिपाॅझिटमध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असल्यास, कमीतकमी 5000 रुपये गुंतवू शकता. जर शाखेत जाऊन गुंतवणूक करायची असल्यास, कमीतकमी 10000 रुपये गुंतवणे आवश्यक आहे. बॅंकेने गेल्याच महिन्यात म्हणजे 17 जुलै 2023 ला एफडीच्या व्याजदरात 10 बीपीएसची कपात केली होती. त्यामध्ये बँकेने 16 महिने ते 17 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या एफडीवर 10 बीपीएस ने व्याजदर कमी केला होता. म्हणजेच 7.20 टक्क्यांवरून व्याजदर 7.10 टक्के केला होता.
नवीन फिक्स्ड डिपाॅझिटचे व्याजदर
नवीन फिक्स्ड डिपाॅझिटच्या व्याजदरानुसार बॅंक 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.50 टक्के व्याजदर देत आहे आणि 46 दिवस ते 60 दिवसांच्या एफडीवर 4 टक्के व्याजदर आहे. तसेच, 61 दिवस ते 3 महिन्यापर्यंतच्या एफडीवर बॅंक 4.50 टक्के व्याजदर देत आहे. तर 3 महिन्यापासून ते 6 महिन्यापर्यंतच्या एफडीवर 4.75 टक्के व्याजदर देत आहे. बॅंक 6 महिन्यापासून ते 9 महिन्यापर्यंतच्या एफडीवर 5.75 टक्के व्याज देत आहे. तर 9 महिन्यापासून 1 वर्षापेक्षा कमी मुदतीच्या एफडीवर 6.00% व्याजदर मिळणार आहे.
तसेच, 1 वर्षापासून ते 1 वर्ष 4 दिवस मुदतीच्या एफडीवर 6.75 टक्के व्याजदर मिळत आहे. बॅंक 1 वर्ष 5 दिवसापासून ते 13 महिन्यापेक्षा कमी मुदतीच्या एफडीवर 6.80 टक्के व्याजदर देत आहे. तसेच, 13 महिने आणि 2 वर्षापेक्षा कमी मुदतीच्या एफडीवर 7.10 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. अॅक्सिस बँकेने 2 वर्ष ते 30 महिन्यांपेक्षा कमी मुदतीसाठी 15 बीपीएस ने व्याजदर वाढवला असून तो आता 7.05 टक्क्यांवरून 7.20 टक्के झाला आहे. तर उर्वरित मुदतीसाठी एफडीवर 7 टक्के व्याजदर मिळणार आहे.
जेष्ठ नागरिकांसाठी व्याजदर
आत्ताच्या सुधारणेनंतर, 7 ते 10 वर्षाच्या मुदतीसाठी फिक्स्ड डिपाॅझिटवर अॅक्सिस बॅंक 3.50 टक्के ते 7.95 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. तर 2 वर्षापासून 30 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या फिक्स्ड डिपाॅझिटवर सर्वाधिक 7.95 टक्के व्याजदर दिला जात आहे.
इंटरनेट बॅंकिंगद्वारे अशी करा अॅक्सिस बॅंकेची एफडी बुक
स्टेप 1: इंटरनेट बॅंकिंगवर लाॅग इन करा आणि डिपाॅझिट पर्याय निवडा.
स्टेप 2: क्रिएट फिक्स्ड डिपाॅझिटवर क्लिक करा.
स्टेप 3: आवश्यक अकाउंट आणि नाॅमिनी डिटेल्स भरा
स्टेप 4: कन्फर्म केल्यावर, निवडलेली रक्कम तुमच्या बचत खात्यातून डेबिट होईल आणि त्वरित तुमची एफडी तयार होईल.