भारतातील वाहन उत्पादक कंपन्यांसाठी वर्ष 2022 भरभराटीचे गेले. गेल्या वर्षभरात भारतात तब्बल 37 लाख 93 हजार वाहनांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. वर्ष 2021 च्या तुलनेत 2022 मधील वाहन विक्रीत 23.1% वाढ झाली. स्कोडा ऑटो फोक्सवॅगन, टाटा मोटर्स, किया मोटर्स, टोयोटा किर्लोस्कर या कंपन्यांच्या वाहनांना ग्राहकांनी पसंती दिली.
सणासुदीला कंपन्यांनी दिलेल्या ऑफर्सचा परिणाम दिसून आला. दिवाळीमध्ये सर्वच कार उत्पादकांची विक्री वाढली होती. ग्राहकांनी भारतीय कंपन्यांबरोबरच परदेशी कार मॉडेल्सला पसंती दिल्याचे दिसून आले. याशिवाय लक्झरी कार्सच्या विक्रीत देखील गेल्या वर्षात वाढ दिसून आली.
वर्ष 2022 मध्ये स्थानिक पातळीवर एकूण 37 लाख 93 हजार वाहनांची विक्री झाली. यात 2021 च्या तुलनेत 23.1% वाढ झाली. टाटा मोटर्सच्या वाहन विक्रीत 58.2% वाढ झाली. त्याचबरोबर किया मोटर्स 40.2%, टोयोटा किर्लोस्कर 22.6% आणि मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीत 15.4% वाढ झाल्याचे दिसून आले आहे. वर्ष 2022 मध्ये टाटा , किया मोटर्स आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्स यांनी आजवरची एका वर्षातील सर्वाधिक वाहनांची विक्री केली आहे.
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया या कंपनीच्या कारच्या विक्रीत 123.3% वाढ झाली आहे. इतर ऑटो कंपन्यांच्या तुलनेत स्कोडा ऑटो फोक्सवॅगनचा ग्रोथ रेट सर्वाधिक आहे. भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक मारुती सुझुकीने वर्ष 2022 मध्ये 15 लाख 80 हजार कार्सची विक्री केली. वर्ष 2021 मध्ये मारुतीने 13 लाख 68 हजार कार्स विकल्या होत्या. वर्ष 2022 मध्ये मारुतीच्या वाहन विक्रीत 15.4% वाढ झाली. पेट्रोल आणि डिझेल मॉडेल्सबरोबरच ग्राहकांनी वर्ष 2022 मध्ये पर्यावरणपूरक इंधन पर्याय अर्थात इलेक्ट्रिक कारला सुद्धा पसंती दिल्याचे दिसून आले. टाटा टियागो ईव्ही कारची वर्ष 2022 सर्वाधिक विक्री झाली.
डिसेंबर वाहन विक्रीने पकडला वेग
वर्षाचा शेवटचा महिना आणि नव्या वर्षातील भाववाढ लक्षात घेत जवळपास सर्वच ऑटो कंपन्यांनी कारवर डिस्काउंट ऑफर्स जाहीर केल्या होत्या. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. डिसेंबर 2022 या महिन्यात देशभरात 2 लाख 28 हजार कारची विक्री झाली. गत वर्षाच्या तुलनेत यात 3.6% वाढ झाली. वाहनांच्या सुट्ट्या भागांचा पुरवठा काही प्रमाणात सुरळीत झाल्याने कंपन्यांनी उत्पादन वाढवले होते. डिसेंबरअखेर काही लोकप्रिय मॉडेल्स वेटिंगवर होते.
या कार्सची सर्वाधिक झाली विक्री
वर्ष 2022 मध्ये ग्राहकांनी नव्या मॉडेल्सला पसंती दिल्याचे दिसून आले. महिंद्रा स्कॉर्पिओ एन, मारुती सुझुकी ग्रॅंड विटारा, टोयोटा हायरायडर, टोयोटा इनोव्हा हायक्रॉस या कार्सची सर्वाधिक विक्री झाली.
वाहन विक्रीत सर्वाधिक वाढ नोंदवणाऱ्या कंपन्या
कंपनी | वाढ |
फोक्सवॅगन | 123.3% |
टाटा मोटर्स | 58.2% |
किया मोटर्स | 40.2% |
टोयोटा किर्लोस्कर | 22.6% |
मारुती सुझुकी | 15.4% |