Electric Scooters: केंद्र सरकारने इलेक्ट्रिक दुचाकींवरील सबसिडी कमी केल्याने गाड्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. होंडा, बजाज, टीव्हीएस, ओला, एथरसह अनेक कंपन्यांच्या गाड्यांच्या किंमती दीड लाख रुपयांच्याही पुढे गेल्या आहेत. मात्र, जर तुम्ही एथर कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार करत असाल तर चिंता करू नका. कारण, या गाडीवर तुम्हाला 100 टक्के पर्यंत कर्ज मिळू शकते.
कंपनीने नुकतेच 60 महिन्यांच्या कर्जाची ऑफर लाँच केल्यानंतर आता पात्र ग्राहकांना 100 टक्के पर्यंत लोन देण्याची सुविधा सुरू केली आहे. यासाठी आघाडीच्या बँक, वित्त संस्थांशी सहकार्य करार केला आहे. त्यामुळे आता लगेच जवळ पैसे नसतील तरीही इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचं तुमचं स्वप्न पूर्ण होईल.
या बँकांतून मिळेल कर्ज
ग्राहकांना IDFC First bank, HDFC bank, ICICI bank, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, हिरो फिनकॉर्प, चोलामंडलम फायनान्सकडून इलेक्ट्रिक स्कूटरवर 100% पर्यंत कर्ज मिळेल. गाड्यांच्या किंमती वाढल्यामुळे एथर कंपनीने ही खास ऑफर लाँच केली आहे. त्यामुळे गाडी घेणं ग्राहकांसाठी अधिक सुलभ आणि सोपं झालं आहे.
पाच वर्षांपर्यंत कर्जाचा कालावधी
टू व्हिलर गाड्यांच्या खरेदीसाठी तत्काळ कर्ज उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांना फायदा होईल. त्यासाठी एथरने आघाडीच्या बँकांशी सहकार्य करार केला आहे. 100% कर्ज आणि पाचवर्षापर्यंत कालावधी असल्याने इलेक्ट्रिक गाडीची किंमत जास्त वाटत असली तरी तत्काळ खरेदी करता येईल, असे एथरचे मुख्य व्यवसाय अधिकारी रवनीत पोखेला यांनी म्हटले.
एथर कंपनीची गाडी खरेदी करताना लोन घेणाऱ्यांची संख्या 6 पट वाढली आहे. मेट्रो शहरांशिवाय इतर छोट्या शहरांतही गाड्यांची विक्री वाढली आहे. कमीत कमी 2,999 इएमआय भरूनही तुम्ही गाडी खरेदी करू शकता.
केंद्र सरकारने नुकतेच इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्मितीवर दिली जाणारी सबसिडी कमी केली आहे. त्यामुळे विविध कंपन्यांच्या गाड्या 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक टू व्हिलर गाड्यांची विक्रीही रोडावली आहे.