यंदा भारतात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहील असा अंदाज आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच ‘एल निनो’चा परिणाम जाणवेल असे हवामान तज्ञांनी म्हटले होते. हवामन तज्ञांचे हे भाकीत आता खरे होताना दिसते आहे. ऑगस्ट महिन्या देशभरात अनेक ठिकाणी पाऊस पाडलाच नाही. सप्टेंबर महिन्यात समाधानकारक पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली होती, मात्र संप्टेंबर महिना संपत आला तरी देशच्या अनेक भागांमध्ये अजूनही पावसाने हजेरी लावली नाहीये.
अशातच आशियाई विकास बँकेने (ADB) 2023-24 साठी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर मंदावेल असा अंदाज व्यक्त केला आहे. याआधी ADB ने भारताचा आर्थिक विकासाचा दर 6.4 टक्के असेल असे म्हटले होते. मात्र पावसाचे कमी प्रमाण आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम लक्षात घेता देशाचा आर्थिक विकास दर 6.3 टक्के असेल असे आशियाई विकास बँकेने नुकत्याच जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे.
शेतीप्रधान अर्थव्यवस्था
भारताची अर्थव्यवस्था ही शेतीप्रधान आहे. शेती उद्योगावर देशातील इतर उद्योग प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अवलंबून असतात. देशातील शेती उत्पन्न अधिक निघाल्यास देशाचा आर्थिक विकास दर तेजीत असतो. मात्र शेती व्यवसायावर आरीष्ट्य आल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो. याचे मुख्य कारण म्हणजे शेतीप्रधान देशात बहुतांश नागरिक हे शेती व्यवसाय आणि त्याच्याशी संबंधित उत्पादन प्रक्रियेत गुंतवलेले आहेत.
यंदा समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याने आशियाई विकास बँकेने भारताच्या आर्थिक विकासाबाबत असा अंदाज वर्तवला आहे. खरे तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने 7.8 टक्के मजबूत वाढ नोंदवली आहे. परंतु ही वाढ टिकवणे किंवा त्यात वृद्धी करणे भारतासाठी थोडेसे अवघड जाऊ शकते असे अहवालात म्हटले आहे.
अन्नधान्य महागाई वाढण्याची शक्यता
आग्नेय आशियातील देशांना ‘एल निनो’चा अधिक परिणाम जाणवणार आहे. त्यामुळे शेती उत्पादन कमी होईल आणि त्याचा परिणाम औद्योगिक उत्पादनावर देखील पाहायला मिळेल असे अहवालात म्हटले आहे.
अपुऱ्या पावसामुळे देशातील अन्नधान्यांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम आतापासूनच दिसायाला लागला आहे. तांदूळ, गहू, तूर, उडद आदी कडधान्यांचे भाव आतपासूनच वाढायला लागले आहेत. कृषी क्षेत्राच्या वाढीचा अंदाज सुमारे एक टक्क्याने कमी होईल असे अहवालात म्हटले आहे.