सध्या मोबाइलच्या एका क्लिकवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. मात्र, गुंतवणूकदार थेट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत नसतो. कोणालाही बाजारात गुंतवणूक करायची असल्यास स्टॉक ब्रोकरची मदत घ्यावी लागते.
थोडक्यात, स्टॉक ब्रोकर हा गुंतवणूकदार आणि शेअर मार्केटमधील मध्यस्थ म्हणून काम करतो. गुंतवणूकदाराने दिलेली शेअर्स खरेदी-विक्रीची ऑर्डर स्टॉक ब्रोकर पार पाडत असतो. मात्र, स्टॉक ब्रोकर म्हणून काम करताना सेबीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असते.
सेबीचे काम काय?
सेबी (Securities and Exchange Board of India) ही संस्था भारतातील संपूर्ण शेअर बाजारात पार पडणाऱ्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. भांडवल व रोखे बाजारावर देखरेख ठेवण्याचे काम सेबीचे आहे. तसेच, गुंतवणूकदाराची फसवणूक होऊ नये यासाठी देखील सेबी नियम तयार करते. स्टॉक ब्रोकरवर नियंत्रण ठेवण्याचे व त्यांच्या कामासाठी विशिष्ट मार्गदर्शक प्रणाली निश्चित करण्याचे काम देखील सेबीद्वारे केले जाते.
स्टॉक ब्रोकर कसे बनू शकता?
भारतीय शेअर मार्केटमध्ये पूर्ण वेळ आणि डिस्काउंट ब्रोकर असे दोन स्टॉक ब्रोकरचे प्रकार आहेत. भारतात एचडीएफसी सिक्युरिटी, झिरोधा, शेअरखान, आससीआयसीआय डायरेक्ट, ग्रो असे काही लोकप्रिय स्टॉक ब्रोकर्स आहेत, ज्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदार बाजारात व्यवहार करू शकता.
स्टॉक ब्रोकर म्हणून काम करण्यासाठी सेबीकडे अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर सेबीच्या बोर्डाकडून त्याची तपासणी केली जाते. अर्जासह आवश्यक असलेली कागदपत्रे व शुल्क जमा करावे लागेल. तसेच, बोर्डाकडून अर्जदार काम करण्यासाठी योग्य आहे का, बाजारातील खरेदी-विक्रीचा अनुभव आहे का, काम करण्यासाठी ऑफिस व इतर सुविधा आहेत का? अशा गोष्टी तपासल्या जातील. अर्ज मंजूर झाल्यास स्टॉक ब्रोकर म्हणून काम करण्यासाठी प्रमाणपत्र दिले जाईल. याशिवाय, सब-स्टॉक ब्रोकर म्हणून काम करण्यासाठीही अर्ज करता येतो.
स्टॉक ब्रोकरसाठी सेबीचे नियम
- स्टॉक ब्रोकरचा बाजारातील हेराफेरी, फसवेगिरी यामध्ये सहभाग नसावा. तसेच, त्याने स्वतःच्या हितासाठी कोणतीही अफवा पसरवू नये.
- सरकार व सेबीद्वारे वेळोवेळी जारी केल्या जाणाऱ्या नियमांचे पालन करणे त्याच्यावर बंधनकारक आहे.
- स्टॉक ब्रोकरने गुंतवणूकदाराने दिलेली ऑर्डरची खरेदी- विक्री ठरलेल्या बाजार किंमतीत व वेळेवरच पूर्ण करायला हवी. केवळ लहान गुंतवणूकदार आहे म्हणून दूर्लक्ष करता येणार नाही. ऑर्डरची त्वरित माहिती व पैशांबबात गुंतवणूकदाराला माहिती देणे बंधनकारक आहे.
- स्टॉक ब्रोकरला व्यवहारांसाठी गुंतवणूकदाराला कॉन्ट्रॅक्ट नोट द्यावी लागेल. तसेच, गुंतवणूकदाराची वैयक्तिक व व्यवहारांबाबतची माहिती इतरांशी शेअर करता येणार नाही.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी व कमिशनसाठी गुंतवणूकदाराला शेअर्स खरेदी-विक्री करण्यासाठी प्रोत्साहन देणार नाही. गुंतवणुकीचा सल्लाही देणार नाही.
थोडक्यात, स्टॉक ब्रोकर म्हणून काम करताना सेबीच्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. गुंतवणूकदारांचे नुकसान होणार नाही, याची खबरादारी घेणे हा या नियमांमागचा प्रमूख उद्देश आहे.