आर्मी कॅन्टीनचं कार्ड आहे का? असं आपण एकदा तरी कोणाच्या तोंडून ऐकलं असेल. नाही का? त्याचबरोबर या ठिकाणी खूप सवलत असते, इतर कोणालाही येथून सामान घेता येत नाही. अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही लोकांकडून ऐकल्या असतील. पण, त्यात खरं-खोट काय आहे? कोण लाभ घेत असेल? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. तर याचा लाभ लष्करातील जवानांसह अन्य कर्मचारी ही घेतात. यामध्ये प्रामुख्याने तिन्ही दलाचे कर्मचारी आर्मी (Army), एअर फोर्स (Air Force) आणि नेव्ही (Navy), त्यांचे कुटुंब तसेच, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा यामध्ये समावेश आहे. या कॅन्टीनचे जवळपास 1.5 कोटी लाभार्थी आहेत. तर कॅन्टीनच्या वस्तूंवर 50 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते.
कॅन्टीनमध्ये काय मिळतं?
आर्मी कॅन्टीनमध्ये किराणा साहित्य, रोजच्या उपयोगातील घरगुती वस्तू, इलेक्ट्राॅनिक वस्तू, लिकर, बाईक आणि कार या वस्तू प्रामुख्याने कॅन्टीनमध्ये मिळतात. त्याचबरोबर काही विदेशी वस्तूही कॅन्टीनमध्ये मिळतात. सर्वांत महत्वाचं म्हणजे लाभार्थीला हव्या असेलेल्या कोणत्याही गोष्टींची ते कॅन्टीनमध्ये मागणी करू शकतात.
सवलत करानुसार!
कॅन्टीनमधील सवलत ठरलेली नाही. मात्र, सरकार करात 50 टक्के सूट देते. म्हणजेच जीएसटी स्लॅब कॅन्टीनमध्ये निम्मा करण्यात आला आहे. जो 5, 12, 18 आणि 28 टक्के आहे. यानुसार तुम्ही मार्केटमध्ये एखाद्या वस्तूवर 5 टक्के GST देत असल्यास, कॅन्टीनसाठी याच्या निम्मा असेल. त्यामुळेच वस्तू येथे खूप स्वस्त मिळतात.
खरेदीवर आली मर्यादा!
याआधी कॅन्टीन कार्डवरून कोणीही सामान खरेदी करु शकतं होतं आणि किती घ्यायचं याला बंधन नव्हतं. त्यामुळे लाभार्थीसह इतरही याचा फायदा घेत होते. पण, आता काही मर्यादा ठरवण्यात आल्या आहेत, त्यानुसारच आता वस्तू खरेदी करता येणार आहेत. यात महिन्याला किंवा वर्षाला ठराविक सामानच खरेदी करता येणार आहे. त्यात साबण, खाद्यपदार्थ आणि इतरही वस्तूंचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे आर्मी कॅन्टीनमधून कार्डशिवाय कोणालाही खरेदी करण्याची मुभा नाही आहे.