जुलै महिना सुरू झाल्यानंतर आता तुमच्याकडे आयटीआर फाइलिंगसाठी (ITR filing) एका महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. आयकर भरण्यासाठी सर्वात लोकप्रिय फॉर्मपैकी एक म्हणजे फॉर्म -1. हा फॉर्म सामान्य पगारदार लोक भरत असतात. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, आयटीआर फॉर्म-1 हा सहज फॉर्म म्हणूनही ओळखला जातो.
कोणासाठी आहे आयटीआर फॉर्म-1?
देशातल्या सामान्य करदात्याकडून आयटीआर फॉर्म-1 दाखल केला जाऊ शकतो. ज्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत पगार, लाभांश, बँक व्याज किंवा फक्त एक घर मालमत्ता आहे आणि शेतीतून वार्षिक उत्पन्न 5000 रुपयांपेक्षा जास्त नाही, हा फॉर्म त्यांच्यासाठी आहे. 50 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले करदाते हा फॉर्म भरू शकतात.
कोणासाठी नाही आयटीआर फॉर्म-1?
- जर करदात्याचे करपात्र उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर ती व्यक्ती आयटीआर फॉर्म-1 भरू शकणार नाही. त्यामुळे एनआरआय हा फॉर्म दाखल करू शकत नाहीत.
- जर एखाद्या व्यक्तीनं म्युच्युअल फंड, सोनं, इक्विटी शेअर्स, हाऊस प्रॉपर्टी आणि इतर स्त्रोतांमधून उत्पन्न मिळवलं असेल तर ती व्यक्ती हा फॉर्म भरू शकणार नाही.
- जर एखाद्या व्यक्तीनं सट्टा मालमत्ता किंवा घोड्यांच्या शर्यती, लॉटरी, कायदेशीर जुगार किंवा इतर स्त्रोतांमधून कमाई केली असेल, तर तेदेखील हा फॉर्म दाखल करण्यास पात्र नसतील.
- एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न एकापेक्षा जास्त घरांच्या मालमत्तेतून असल्यासदेखील तो आयटीआर-1 दाखल करू शकणार नाही. याशिवाय या देशातील अनिवासी भारतीय किंवा अनिवासी नागरिक हा फॉर्म दाखल करण्यास अपात्र आहेत.
- बँकेतून पैसे काढताना तुमच्यावर 194N नुसार टीडीएस आकारला गेला असेल, तर तुम्ही हा फॉर्म भरण्यास अपात्र असाल. शिवाय, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUFs) हेदेखील आयटीआर फॉर्म 1 दाखल करू शकत नाहीत.
पात्र नसतानाही फॉर्म 1 भरल्यास काय तोटा?
समजा कोणी चुकून आयटीआर फॉर्म-1 भरला तर आयकर विभागाकडून तुम्हाला नोटीस पाठवली जाऊ शकते. नोटीसच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत सुधारित आयटीआर दाखल करणं गरजेचं आहे. असं न झाल्यास, तुम्ही भरलेला संबंधित आयटीआर अवैध मानला जाणार आहे.