Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Interest Subsidy Education Loan: केंद्राची व्याजदर सवलत योजना तुम्हाला माहिती आहे का?

Interest Subsidy Education Loan

Image Source : www.india-employmentnews.com/www.education.gov.in

Interest Subsidy Education Loan: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या शिक्षण विभागामार्फत व्याजदर सवलत योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कर्जावर सवलत दिली जाते.

केंद्र सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालयातर्फे 2009 पासून केंद्रीय व्याजदर सवलत अनुदान योजना (Central Sector Interest Subsidy Scheme-CSIS) राबवली जात आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना कोर्सच्या कालावधी व्यतिरिक्त अधिकच्या एक वर्षाकरीता शैक्षणिक कर्जावर सवलत दिली जाते. ही व्याजदर सवलत योजना भारतात आणि परदेशात उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते.

ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यांच्या कुटुंबात एका वर्षात साधारण 4.5 लाखापर्यंत उत्पन्न येते. त्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत बँकांकडून शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जे विद्यार्थी बारावीनंतर मान्यताप्राप्त तांत्रिक किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच ही योजना लागू होते. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नोड्ल बँक म्हणून सरकारने Canara Bank ची नेमणूक केली आहे. या योजने संदर्भातील संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

व्याजदर सवलत योजनेसाठी कोण पात्र आहे?

जे विद्यार्थी बारावीनंतर मान्यताप्राप्त तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छित आहेत. ते विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.

व्याजदर सवलतीचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज घेणे आवश्यक आहे का?

होय, जे विद्यार्थी शेड्युल्ड बँकेतून शैक्षणिक कर्ज घेतील. त्यांनाच व्याजदर सवलत योजनेचा लाभ घेता येईल.

या योजनेसाठी उत्पन्नाची मर्यादा आहे का?

होय, या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 4.5 लाखापेक्षा अधिक नसले पाहिजे. 4.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

व्याज सवलत योजनेसाठी काही मर्यादा आहे का?

व्याज सवलत योजनेंतर्गत शेड्युल्ड बँकेतून जास्तीत जास्त 10 लाखांपर्यंतच्या कर्जावर सवलत दिली जाते. 10 लाखापेक्षा अधिकच्या कर्जाच्या रकमेवर व्याज सवलत दिली जात नाही. तसेच 7.50 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी हमीची किंवा गॅरेंटरची गरज पडत नाही.

CENTRAL EDUCATIONAL LOAN INTEREST BENEFIT SCHEME

व्याज सवलत योजनेचा कालावधी किती असतो?

व्याज सवलत योजनेचा कालावधी कोर्सचा कालावधी आणि त्यावर अधिकचा 1 वर्षाचा कालावधी असा असतो. या कालावधीनंतर विद्यार्थ्याला योजनेचा लाभ मिळत नाही.

योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे का?

होय, राज्य सरकारने नेमून दिलेल्या अधिकृत अधिकाऱ्याच्या सहीने देण्यात आलेला उत्पन्नाचा दाखला या योजनेसाठी ग्राह्य धरला जातो.

प्रत्येक वर्षी उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो का?

नाही, अर्जदाराल प्रत्येक वर्षी उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही. कुटुंबाच्या उत्पन्नात काही किरकोळ बदल झाले तरी विद्यार्थ्याच्या पात्रतेत विशेष फरक पडत नाही.

व्याजदर सवलत योजना विद्यार्थ्याला एकदाच उपलब्ध असेल. अभ्यासक्रम अर्धवट सोडणाऱ्या किंवा कॉलेजमधून काढून टाकलेल्या विद्यार्थ्याला व्याज दरात सवलत मिळणार नाही.