ग्रामीण भागातील नोकऱ्यांमध्ये किरकोळ वाढ होत असतानाही भारतातील बेरोजगारीचा दर चौथ्या महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये बेरोजगारी दर 8.11% इतका नोंदवला गेला आहे. गेल्या 4 महिन्यांतील हा उच्चांक असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. जागतिक स्तरावर आर्थिक मंदीचे सांवट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगार कपातीचे सत्र सुरु आहे. याचा थोडा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळाला. जागतिक कंपन्यांसोबतच भारतीय स्टार्टअप्स कंपन्यांनी देखील गेल्या 2-3 महिन्यात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. याचाच परिणाम या अहवालात दिसून येत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार मार्चमध्ये बेरोजगारीचा दर 7.80% इतका नोंदवला गेला होता, तर फेब्रुवारीमध्ये बेरोजगारीचा दर 7.45% इतका होता. आणि आता एप्रिलमध्ये बेरोजगारी दर 8.11% पर्यंत वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण भागात अधिक रोजगार
CMIE च्या अहवालानुसार शहरी भागातील बेरोजगारीचे प्रमाण ग्रामीण भागाच्या तुलनेत वाढले असल्याचे आढळले आहे. एप्रिलमध्ये शहरी बेरोजगारीचे प्रमाण 8.51% वरून 9.81% इतके वाढले आहे. मात्र, एप्रिलमध्ये ग्रामीण भागातील बेरोजगारीत थोडीशी घट झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे. ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असल्याचे अहवालात म्हटले आहे. मागील महिन्यात ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर 7.47% इतका नोंदवला गेला होता, आता तो 7.34 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या शेतीची कामे सुरु असून ग्रामीण भागात हंगामी रोजगार उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अल्प प्रमाणात बेरोजगारी दरात सुधारणा पहायला मिळते आहे असे जाणकारांचे मत आहे.
Unemployment rate rose to 8.11% in April from 7.8% in March. Urban unemployment climbed to 9.81% from 8.51% in the same period and rural unemployment fell marginally to 7.34% in April from 7.47% a month ago, data from the research firm Centre for Monitoring India Economy showed pic.twitter.com/g7IRDjpa3b
— PartTimeTrader?? (@PartTimeeTrader) May 2, 2023
कसा ठरवला जातो बेरोजगारीचा दर?
एप्रिल महिन्यात बेरोजगारी दर 8.11% इतका नोंदवला गेला आहे, म्हणजेच 1000 लोकांपैकी 81 लोकांना रोजगार मिळालेला नाही. देशातील बेरोजगारीची पहाणी करण्यासाठी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ही खासगी कंपनी काम करते.या कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे.
दर महिन्याला शास्त्रशुध्द पद्धतीने ही पाहणी केली जाते. CMIE चे स्वयंसेवक घरोघरी जाऊन रोजगाराच्या शोधात असलेल्या 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करते. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात हे सर्वेक्षण केले जाते. या आधारावर दर महिन्याला बेरोजगारी संबंधी माहिती सार्वजनिक केली जाते.