Apple Laptop Sale: भारतातील उच्च उत्पन्न गटातील म्हणजेच प्रिमियम मार्केट काबीज करण्यासाठी अॅपल कंपनी प्रयत्नशील आहे. वाढती बाजारपेठ पाहता कंपनीने नुकतेच भारतामध्ये दिल्ली आणि मुंबईत स्वत:चे दोन रिटेल स्टोअर सुरू केले. दरम्यान, अॅपलचे लॅपटॉप आणि डेस्कटॉपची विक्री रोडावल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. भारतात आयात होणाऱ्या अॅपलच्या लॅपटॉप आणि डेस्कटॉपची संख्या कमालीची रोडावली आहे. भारतामध्ये अॅपलचे निर्मिती प्रकल्प वाढत असताना पीसी श्रेणीतील उत्पादनांची विक्री मात्र कमी होत आहे.
2023 वर्षातील जानेवारी-मार्च तिमाहीची आकडेवारी हाती आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अॅपल लॅपटॉप आणि डेस्कटॉपची आयात 40% नी घटली. उत्पादनांची मागणी कमी झाल्यामुळे आयातही कमी झाली. सहा महिन्यानंतर विक्री पुन्हा वाढू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. 2022 वर्षात अॅपलच्या उत्पादनांची मागणी 100 टक्क्यांनी वाढली होती. मात्र, कोरोना साथ संपल्यानंतर पुन्हा विक्री घटली.
अॅपलची विक्री कमी होण्यामागील कारणे?
जागतिक मंदीचे सावट प्रमुख अर्थव्यवस्थांवर घोंगावत असल्याने मागणी आणि पुरवठा विस्कळीत झाला आहे. तसेच कोरोना काळात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची वाढ झपाट्याने होत होती. त्या काळात कॉम्प्युटर हार्डवेअरची डिमांड वाढली होती. मात्र, कोविडचा प्रभाव ओसरल्यानंतर माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरू झाली. तसेच कंपन्यांचा व्यवसायही मंदावला. नवीन उत्पादने खरेदी करण्यास कंपन्या तयार नाहीत. खर्च कमी करण्यासाठी कंपन्या उपाययोजना राबवत असताना नवीन हार्डवेअर खरेदी थांबवल्याचे दिसून येत आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम अॅपलच्या विक्रीवर झाला.
आणखी पाच ते सहा महिन्यानंतर अॅपलने पीसी आणि लॅपटॉपचा अतिरिक्त स्टॉक करुन ठेवावा. कारण अचानक मागणी वाढण्याची शक्यता आहे, असे बाजार विश्लेषक कंपनी IDC India ने म्हटले आहे. भारतातच नाही तर जगभरात अॅपलच्या PC श्रेणीतील उत्पादनांची विक्री कमी झाली आहे. अॅपलच्या एकूण महसुलापैकी 10% महसूल पर्सनल कॉम्प्युटर विक्रीतून येतो.
पर्सनल कॉम्प्युटर विक्रीतील आघाडीच्या कंपन्याचा बाजारातील वाटा (2022)
एचपी - 31.5%
डेल टेक्नॉलॉजी - 23.6%
लिनोवो - 18.4%
एसर ग्रुप- 8.2%
असूस - 5.9%
अॅपल - 5.4%
जगभरातील अॅपलच्या पीसी, लॅपटॉपच्या विक्रीचा विचार करता 29% टक्क्यांनी मागणी रोडावली आहे. भारतामध्ये पर्सनल कॉम्प्युटर विक्रीत एचपी प्रथम क्रमांकावर आहे. पहिल्या पाच क्रमांकामध्ये अॅपलचा समावेश नाही. 2021 साली अॅपल कंपनीच्या मॅकबुकची भारतातील मागणी 300 टक्क्यांनी वाढली होती. कॉर्पोरेट कंपन्यांकडून सर्वाधिक मागणी अॅपलच्या उत्पादनांना होती.