Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple India Store: अॅपल भारतीय मार्केट कसं काबीज करणार? CEO टीम कूक यांच्या भेटीचे संकेत काय सांगतात?

Apple India Store

मुंबईतील बिकेसी येथे उद्या (18 एप्रिल) आणि दिल्लीतील साकेत येथे 20 तारखेला अॅपलची स्वत:ची दोन रिटेल स्टोअर सुरू होत आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाला Apple चे सीइओ टीम कूक हे देखील उपस्थित राहतील, अशी माहिती समोर येत आहे. भारतातील प्रिमियम गॅझेट बाजारपेठ काबीज करण्याचे नियोजन कंपनीने आखले आहे. सोबतच अॅपल निर्मिती प्रकल्पही उभे राहत आहेत. पुढील काही वर्षात अॅपलचा भारतातील प्रवास कसा असेल, जाणून घ्या.

Apple India Store: चालू आठवड्यात अॅपल कंपनीने भारतात पाऊल ठेवल्याच्या घटनेस 25 वर्ष पूर्ण होतील. त्या निमित्ताने अॅपलने भारतामध्ये मार्केट काबीज करण्यासाठी दीर्घकालीन नियोजन आखल्याचे दिसून येतेय. त्याचाच एक भाग म्हणून 18 आणि 20 एप्रिलला मुंबई आणि दिल्लीत अॅपलची स्वत:ची दोन स्टोअर सुरू होत आहेत. (Apple India Retail Store) या स्टोअरच्या उद्घाटनाचा मोठा गाजावाजा सुरू आहे. Apple CEO टीम कूक स्टोअरच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजर राहतील, अशी चर्चा सुरू आहे. मागील वर्षभरापासून अॅपल कंपनीने भारतामध्ये मोबाईल निर्मिती करण्यावरही भर दिला आहे. त्यामुळे भविष्यात अॅपलची भारतातील प्रगती कशी असेल याकडे सर्वांची उत्सुकता लागलेली आहे.

वारसा पुढे नेण्यास उत्सुक

अॅपलचा भारतातील इतिहास २५ वर्षांचा आहे. हा वारसा पुढे वाढवत नेण्यास उत्सुक आहोत, असे टीम कूक यांनी नुकतेच म्हटले आहे. मुंबईतील अॅपल बीकेसी (Apple BKC) आणि दिल्लीतील अॅपल साकेत (Apple Saket) येथील स्टोअरच्या उद्घाटन सोहळ्याला टीम कूक हजेरी लावण्याची शक्यता आहे. या भेटीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच इतर मंत्री आणि उद्योजकांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. भारतातील कंपनीचे धोरणे, व्यवसाय वृद्धी, रोजगार, निर्मिती प्रकल्प याबाबत चर्चा करतील. भारतामध्ये पाय रोवण्याबरोबरच दक्षिण आशियाई देशांमधील मार्केट काबीज करण्याचा अॅपलचा मानस आहे.

प्रिमियम बाजारपेठेवर अॅपलचा डोळा

अॅपलची मोबाईल, स्मार्ट वॉच आणि इतर सर्व उत्पादने प्रिमियम सिरिजमध्ये मोडतात. या उत्पादनांच्या किंमती जास्त असून फक्त श्रीमंत वर्गच अॅपलची उत्पादने खरेदी करतो. भारतामध्ये मागील काही वर्षात संपत्तीचे असमान वाटप वाढले आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे, देशात भाववाढ होत असतानाही आलिशान गाड्यांचा खप वाढला असून सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांची खरेदी क्षमता कमालीची रोडावली आहे. किराणा सामानापासून गरजेच्या अनेक गोष्टी खरेदी करताना सर्वसामान्य जनता हात आखडता घेत आहे. 

श्रीमंत वर्ग किंमत वाढीला संवेदनशील नसतो. म्हणजे या वस्तूंच्या किंमती वाढल्या तरी खरेदी कमी होत नाही. या संधीचा फायदा उठवण्याकडे अॅपल कंपनीने लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते. भारतातील प्रिमियम श्रेणीतील ग्राहक काबीज करण्यासोबतच मार्केट फूटप्रिंट वाढवण्याकडे अॅपल लक्ष देत आहे. त्यास सरकारची साथ असल्याचे दिसून येतेय.

भारता अॅपलची निर्मिती का?

कोरोनाकाळात जगभरात पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. त्यामुळे अॅपल कंपनीने चीनमधील निर्मिती प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली. यास अमेरिका-चीन शीतयुद्धाची किनारही आहे. दोन्ही देशांतील वाद वाढत असून अस्थिर राजकीय परिस्थितीत चीनबाहेरच निर्मिती प्रकल्प नेण्यास बड्या उद्योगांचा कल आहे. अॅपल मोबाईल आणि गॅझेट्स भारतातील कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशात अॅसेंबल केली जातात. ही कंत्राटे अॅपलने तैवानी कंपन्यांना दिली आहेत. चीनमधील प्रकल्प भारतामध्ये येत आहेत. त्यास भारत सरकारचेही प्रोत्साहन आहे. भविष्यात ही कंत्राटे भारतीय कंपन्यांनाही मिळतील. टाटा कंपनी अॅपलचे निर्मिती कंत्राट घेणार, अशा बातम्याही माध्यमांमध्ये आल्या होत्या.  

निर्मिती प्रकल्प भारतात आणल्याने चीनला शह 

चीनला निर्मिती क्षेत्रात शह देण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. चीनमधील निर्मिती प्रकल्प भारतात येत असताना भारताकडून या उद्योगांना रेड कार्पेट अंथरण्यात येत आहे. 2017 सालापासून अॅपलने भारतात आपल्या उत्पादनांची निर्मिती सुरू केली. विविध सुविधा, सवलती मिळाल्याने या कंपन्यांही भारतात येण्यास उत्सुक असल्याचे दिसते. Foxconn, Wistron and Pegatron या तीन कंपन्यांकडे अॅपलचे गॅझेट निर्मितीचे कंत्राट आहे. या कंपन्यांची भारतात निर्मिती प्रकल्प आहेत. 2023 च्या जानेवारी महिन्यापासून मार्च या तीन महिन्यांच्या काळात अॅपल कंपनीने भारतात 7 बिलियन डॉलरची गॅझेट तयार केले. ही उत्पादने देशांतर्गत विक्री केली. तसेच 5 बिलियन डॉलरची उत्पादने निर्यात केली. 

भविष्यात अॅपल निर्मिती प्रकल्प विस्ताराच्या योजनाही कंत्राटदार कंपन्यांनी आखल्या आहेत. फॉक्सकॉन कंपनी कर्नाटक आणि तेलंगणात मिळून 300 एकरचा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आखत आहे. यातून मोठी रोजगार निर्मिती होईल. सध्या भारतात iPhone SE, iPhone 12, iPhone 13 and iPhone 14 मधील बेसिक व्हर्जन मोबाईलची निर्मिती होते. तर Pro सिरिजमधील मोबाईल परदेशातून भारतात आयात होतात.