यावर्षीचा अर्थसंकल्प (Union Budget 2023) जाहीर झाल्यानंतर लगेचच सामान्यांना महागाईचा जोरदार फटका बसला आहे. देशातील मोठ्या 2 खासगी दूध कंपन्यांनी दूध दरात भाववाढ केली आहे. गोवर्धन आणि अमूल ब्रँडने दुध दरात भाववाढ केल्याचे जाहीर केले आहे. उत्पादन खर्च वाढल्यामुळे ही भाववाढ करत असल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे.
गोवर्धन दुधात 2 रुपयांनी भाववाढ!
देशातील सर्वात मोठ्या खासगी डेअरीपैकी एक असलेल्या गोवर्धन ब्रँडने 2 फेब्रुवारीपासून दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. गोवर्धन गोल्ड दुधाची किंमत पूर्वी 54 रुपयांच्या तुलनेत आता 56 रुपये प्रति लिटर असेल. एका महिन्यात गोवर्धन ब्रँडची ही दुसरी दरवाढ आहे. गोवर्धन मुंबईत दररोज 2.5 लाख लिटर गायीच्या दुधाची विक्री करतात. ब्रँडचे मालक असलेले पराग मिल्क फूड्सचे चेअरमन देवेंद्र शाह यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, "ऊर्जा, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि पशुखाद्याच्या खर्चात झालेल्या वाढीमुळे ऑपरेशन आणि दूध उत्पादनाच्या एकूण खर्चात वाढ झाली आहे."
अमूल दुधाच्या किमतीत भाववाढ!
अमूल कंपनीने देखील दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने गाईच्या दूध दरात प्रतिलिटर तीन रुपयांपर्यंत वाढ जाहीर केली आहे. नवीन किमती तत्काळ प्रभावाने लागू होतील असेही कंपनीने म्हटले आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, भाववाढीनंतर, अमूल गोल्ड 66 रुपये प्रति लिटर, अमूल फ्रेश 54 रुपये प्रति लीटर, अमूल गायीचे दूध 56 रुपये प्रति लिटर आणि अमूल म्हशीचे दूध 70 रुपये प्रति लीटर असेल. अमूलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रतिलिटर दोन रुपयांनी दरवाढ केली होती. एकूणच कामकाजाचा खर्च आणि दुधाचे उत्पादन वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
Amul has increased prices of Amul pouch milk (All variants) by Rs 3 per litre: Gujarat Cooperative Milk Marketing Federation Limited pic.twitter.com/At3bxoGNPW
— ANI (@ANI) February 3, 2023
भाववाढीची कारणे काय?
गेल्या वर्षीच्या तुलनेत एकट्या पशुखाद्याचा खर्च सुमारे 20 टक्क्यांनी वाढला आहे. शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करताना 8-9% भाववाढ दिली असल्याचे दुध कंपन्यांनी म्हटले आहे. गेल्या आठ महिन्यात अतिवृष्टी, हिरव्या चाऱ्याची कमतरता आणि पशुखाद्याच्या वाढत्या किमती यामुळे पशुपालनाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे दुध उत्पादनाचा देखील खर्च वाढला आहे असे कारण अमूल आणि गोवर्धन कंपनीने दिले आहे.