अमेरिकेतील नोकर कपातीचे लोण आता भारतात देखील पसरु लागले आहे. ई-कॉमर्समधील आघाडीची कंपनी अॅमेझॉनने भारतात 500 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचचले आहे.नजिकच्या काळात सर्वच विभागांत नोकर कपातीचे संकेत कंपनीकडून देण्यात आले आहेत.त्यामुळे अॅमेझॉनमधील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अॅमेझॉनने नोकर कपातीच्या दुसऱ्या टप्प्यात जगभरातील 9000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले होते. 20 मार्च 2023 रोजी कंपनीने कर्मचाऱ्यांना मेमो पाठवले होते. कंपनीच्या दिर्घकाळातील हिताच्या दृष्टीने कर्मचारी कपात करण्याचा कटु निर्णय घेण्यात आल्याचे अॅमेझॉन सीईओ अॅंडी जेसी यांनी म्हटले होते. मागील काही महिन्यात अॅमेझॉनमधून किमान 18000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे.
अॅमेझॉनचे जगभरात सुमारे 3 लाख कर्मचारी आहेत. त्यापैकी अॅमेझॉन इंडियाकडे किमान 1 लाख कर्मचाऱ्यांचा ताफा आहे. त्यापैकी किती कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार हे कंपनीने गोपनीय ठेवले आहे. पहिल्या टप्प्यात सर्व विभागातील 500 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. यात अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस, एच.आर आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे. अचानक नोकरी गेल्याने अनेक कर्मचारी डिप्रेशनमध्ये गेले आहेत. यातील काहींनी सोशल मीडियावर आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
डिसेंबर 2022 पासून लाखो कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली
डिसेंबरपासून अमेरिकेतील बड्या टेक कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले होते. यात मेटा, अॅमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर या कंपन्यांचा समावेश होता. भारतात देखील या नोकर कपातीचा परिणाम दिसून आला होता.अॅमेझॉनने याच दरम्यान भारतात देखील नोकर कपात करण्याची घोषणा केली होती. महागाई, वाढते व्याजदर आणि मंदीच्या प्रभावामुळे कंपन्यांनी काटकसर करत नोकर कपातीचा मार्ग अवलंबला. यामुळे डिसेंबरपासून आयटी क्षेत्रातले लाखो कर्मचारी बेरोजगार झाले.