अॅमेझॉनने नुकतीच एअर कार्गो सेवा भारतामध्ये सुरू केली आहे. मेट्रो शहरांमध्ये आता अॅमेझॉनद्वारे जलद मालाची डिलिव्हरी करण्यात येणार आहे. एअर कार्गो सुरू करणारी अॅमेझॉन ही भारतातील पहिलीच कंपनी आहे. या क्षेत्रातील भविष्यातील संधी ओळखून अॅमेझॉनने कार्गो सुविधा सुरू केली आहे. माल वाहतुकीसाठी बोईंग विमान वापरण्यात येणार असून कंपनीने कंत्राटी पद्धतीने एअर डिलिव्हरीचे काम सुरू केले आहे.
कोणत्या शहरात एअर कार्गो सुविधा चालणार(Amazon Air Cargo facility in India)
इंडिगो, स्पाईसजेट, विस्तारा या कंपन्यांच्या विमानांचाही कार्गो वाहतुकीसाठी वापर करण्यात येणार आहे. क्विक एअर या कंपनीला अॅमेझॉनने मालवाहतुकीसाठी कंत्राट दिले आहे. बंगळुरु, हैदराबाद, नवी दिल्ली आणि मुंबई या शहरांमध्ये कार्गो वाहतूक प्रामुख्याने केली जाणार आहे. उद्योग आणि व्यवसाय यांच्यासाठी एअर कार्गो जास्त फायद्याची ठरणार आहे. त्याद्वारे जलद मालाची ने-आण होणार आहे.
मालाची वाहतूक जलद होणार(Quick delivery by Amazon air)
"क्विक जेट या कंपनीकडून अॅमेझॉनने दोन विमाने भाडेतत्वावर घेतली आहेत. अमेरिकेमध्ये अॅमेझॉन एअर सेवेमध्ये 90 विमाने आहेत. तर इतर देशांमध्ये एकूण 150 कार्गो विमाने कंपनीद्वारे वापरण्यात येतात. एअर कार्गोमुळे जलद मालाची वाहतूक होते, असे अॅमेझॉन इंडियाचे व्हाइस प्रेसिडेंट अखिल सक्सेना यांनी म्हटले. याआधी एअर कोर्गोसाठी माल पाठवायचा असेल तर सायंकाळी 7 पर्यंत विमानतळावर घेऊन जावा लागे. मात्र, आता रात्री 10 पर्यंतही सामान विमानतळावर नेले तरी खास कार्गो विमानांद्वारे मालाची वाहतूक होऊ शकते. तसेच यामुळे अॅमेझॉन फुलफिलमेंट सेंटरवर शिपमेंट लवकर पोहचेल. एकंदर त्यामुळे कंपनीचा व्यवसाय वाढेल, असेही सक्सेना यांनी म्हटले.
भारतात अॅमेझॉनची सर्वात जास्त गुंतवणूक हैदराबाद शहरात (Amazon's largest investment in Hyderabad)
अॅमेझॉन कंपनीने भारतामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक तेलंगणा शहरात केली असून हैदराबादमध्ये सुमारे 36 हजार 300 कोटींची गुंतवणूक कंपनीकडून करण्यात आली आहे. एअर कार्गोची सुविधा हैदराबाद शहरातुनही ऑपरेट केली जाणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंत्रशेखर राव यांचे पुत्र आणि राज्याचे वाणिज्य मंत्री के. टी रामाराव हे अॅमेझॉन कार्गो सेवा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. तत्कालीन अॅमेझॉन इंडियाचे प्रमुख अमित अगरवाल यांची 2014 साली विमानामध्ये भेट झाली होती. तेव्हा त्यांना हैदराबादमध्ये आमंत्रित केले होते. या भेटीनंतर अॅमेझॉन कंपनीने हैदराबादमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अॅमेझॉनचा मोठा कॅम्पस आणि तीन डेटा सेंटर्स हैदराबादमध्ये असल्याचे के. टी रामाराव यांनी सांगितले.