Ajay Banga: वर्ल्ड बँकेचे प्रमुख आणि मूळचे पुणेकर अजय बंगा पुढील आठवड्यात भारत भेटीवर येणार आहेत. G20 देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये अहमदाबाद येथे पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. या बैठकीला बंगा हजर राहणार आहेत. जागतिक बँकेच्या प्रमुखपदी निवड झाल्यानंतर बंगा प्रथमच भारताचा दौरा करत आहेत.
पुणेकर अजय बंगा यांच्याविषयी
अमेरिकन नागरिक असलेले अजय बंगा मूळचे भारतीय वंशाचे आहेत. पुण्यातील खडकी येथे 10 नोव्हेंबर 1959 साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हरभजन सिंग बंगा (Harbhajan Singh Banga) भारतीय लष्करात लेफ्टनंट जनरल होते.
बंगा यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून (St. Stephen's College, University of Delhi) अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली. तसेच त्यांनी आयआयएम (IIM) अहमदाबादमध्ये व्यवस्थापन (Managment) विषयात पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदावर काम केले.
जी-20 देशांचे अध्यक्षपद भारताकडे
जून महिन्यात अजय बंगा यांनी जागतिक बँकेच्या प्रमुख पदाची सुत्रे हाती घेतली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यांची बिनविरोध निवड देखील झाली. भारताकडे यावर्षी जी-20 देशांचे प्रमुखपद आहे. त्यामुळे सर्व प्रमुख बैठका भारतातील विविध शहरांमध्ये होत आहेत. जी-20 सदस्य देशांपुढील प्रमुख अडचणी, प्रगतीच्या संधी, आर्थिक व्यवहार, विविध गटांचे आणि संस्थांचे सक्षमीकरण, सुरक्षा अशा मुद्द्यांवर बैठकी होत आहेत.
उद्योगपतींशी साधणार संवाद
अहमदाबाद येथील G20 देशांच्या बैठकीला भारतीय उद्योगपतींचे प्रतिनिधी मंडळही सहभागी होणार आहे. त्यांच्याशी जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा संवाद साधणार आहेत. चीन, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, ब्रिटन, भारत सह 20 देश G20 देशांच्या संघटनेत आहेत. G20 देशांचा जीडीपी जगाच्या एकूण 85% आहे तर जागतिक व्यापारातील या 20 देशांचा वाटा 75% आहे. त्यामुळे या संघटनेला जागतिक स्तरावर मोठे महत्त्व आहे.