साधारणत: जेव्हा विमान प्रवासाबाबत चर्चा होते, तेव्हा त्याबाबत बरीच चर्चा होते. तुम्हीही हे ऐकले असेल की, विमान प्रवासादरम्यान (Air Travel) एखाद्या मुलाचा जन्म झाला, तर त्या मुलाला आयुष्यभर विमान कंपनीचे मोफत विमान तिकीट मिळते. इंटरनॅशनल फ्लाईट (International Flight) दरम्यान एखाद्या मुलाचा जन्म झाला तर त्याला जागतिक नागरिकत्व मिळते हेही तुम्ही ऐकले असेल. त्यानंतर त्याला कोणत्याही देशात जाण्यासाठी व्हिसा घेण्याची गरज भासणार नाही. खरंच विमान प्रवासादरम्यान जन्मलेल्या मुलाला आयुष्यभर मोफत विमान तिकीट मिळते का? यामागील सत्य जाणून घेऊया.
विमान प्रवासादरम्यान जन्मलेल्या बाळाला आयुष्यभर मोफत विमान तिकीट मिळतं किंवा त्या मुलाला जागतिक नागरिकत्व देण्यात येतं. याचा फायदा म्हणजे त्या व्यक्तीला कोणत्याही देशात जाण्यासाठी व्हिसा घ्यावा लागणार नाही. मुलाच्या जन्माच्या वेळी विमान ज्या देशावरून उड्डाण करत असेल, त्या देशाचे नागरिकत्व त्या मुलाला मिळते असे अनेकदा आपण ऐकतो. पण हे सर्व खरचं आहे का?
मुलाला जागतिक नागरिकत्व मिळते का?
एव्हिएशन इंडस्ट्रीशी संबंधित तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हे सर्व खरोखरच गॉसिप आहे. वस्तुस्थिती अशी आहे की गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांमध्ये महिलांना विमान प्रवास टाळण्यास सांगितले जाते. 36 आठवड्यांनंतर महिलेला विमानाने प्रवास करण्याचीही परवानगी नाही. असे असले तरी, एखाद्या स्त्रीची प्री-डिलिव्हरी विमान प्रवासात झाली, तर बाळाला पालकांचे राष्ट्रीयत्व दिले जाण्याची 99% शक्यता असते. मुलाला जागतिक नागरिकत्व दिल्याचे कुठेही ऐकू येत नाही.
मोफत विमान तिकिटे मिळतात का?
बहुतेक विमान कंपन्या विमानात जन्मलेल्या मुलाला आयुष्यभरासाठी मोफत प्रवासाची तिकिटे देतात, असे ऐकण्यात आले असेल. पण हे देखील खरं नाही. आतापर्यंत कोणत्याही विमान कंपनीने याला दुजोरा दिलेला नाही. असो, एखाद्याला आयुष्यभर मोफत तिकीट देणे हा एक कठीण निर्णय आहे. तसा कोणताही नियम नाही. हा, पण कोणतीही एअरलाइन त्यांना हवी असल्यास ते करू शकते. ऑगस्ट 2016 मध्ये असेच एक प्रकरण समोर आले होते. सेबू पॅसिफिक एअरचे विमान दुबईहून फिलीपिन्सला जात होते. फ्लाइटमधील गर्भवती महिलेची ड्यू डेट ऑक्टोबरमध्ये होती. पण त्याच फ्लाइटमध्ये तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या. आकाशातच त्या महिलेने अकाली जन्मलेल्या पण निरोगी बाळाला जन्म दिला. यानंतर, फ्लाइटचे आपत्कालीन लँडिंग भारतातील हैदराबादमध्येही करण्यात आले. नंतर, सेबू पॅसिफिक एअरने मुलीला 1,000,000 गेट गो पॉइंट्स जाहीर केले. या पॉइंट्सऐवजी, ती मुलगी या एअरलाइन्सची तिकिटे कधीही घेऊ शकते.