टाटा ग्रुपने एअर इंडिया ताब्यात घेतल्यानंतर कंपनीचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच एअर इंडियाने सुमारे पाचशे नव्या विमानांची ऑर्डर दिली. तोट्यातील एअर इंडिया नफ्यात आणण्यासाठी टाटा ग्रुपकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आता टाटा कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत फ्लाइटच्या तिकिटांचे दर ठरण्यासाठी घेतली आहे. पारंपरिक पद्धतीने तिकिटाचे दर ठरवण्याच्या पद्धतीला एअर इंडियाने बदलण्यास सुरुवात केली आहे.
विमान कंपनीच्या दर दिवशी हजारो फ्लाइट्स सुरू असतात. अनेक बाजार घटकांमुळे तिकिटाचे दर कमी जास्त करावे लागतात. सण-उत्सव किंवा उन्हाळी सुट्टीच्या काळात तिकीट महाग असते. तिकिटाचे दर ठरवण्यासाठी पूर्वीपासून एअर इंडियाकडून पारंपारिक मॅन्युअल पद्धतीचा वापर केला जात होता. त्यासाठीची सॉफ्टवेअर प्रणालीही जुनी होती. त्यामुळे कंपनीने हे काम आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. Open AI कंपनीने बनवलेल्या Chat GPT द्वारे एअर इंडियाच्या फ्लाइट्सचे दर ठरवले जातील. मागील काही दिवसांपासून चॅट जीपीटी लाँच झाल्यापासून मोठी चर्चाही सुरू आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर या प्रणालीची चाचणी सुरू आहे.
कशी असेल नवी प्रणाली?
Chat GPT हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अल्गोरिदमद्वारे काम करतात. या अल्गोरिदमध्ये तिकिटासंबंधीचा डेटा फीड केला जातो. मशिन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापरही यामध्ये केला जातो. सध्या एअर इंडिया Chat GPT आधारित प्रणालीची टेस्टिंग घेत आहे. सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर नवीन सॉफ्टवेअर वापरण्यात येईल. प्रत्येक फ्लाइटमधून जास्तीत जास्त पैसे कमावता यावेत हा नवी प्रणाली लाँच करण्यामागील उद्देश आहे. इतर काही कंपन्यांनी AI आधारित तिकीट प्रणाली लागू केली आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी एअर इंडिया सज्ज झाली आहे.
एअर इंडिया सरकारी मालकीची कंपनी होती. मात्र, अनेक वर्ष तोट्यात असल्याने सरकारला कंपनी चालवणे अशक्य झाले होते. टाटा ग्रुपने ही कंपनी ताब्यात घेतल्यानंतर कंपनी फायद्यात आणण्यासाठी मोठी गुंतवणूक सुरू केली आहे. लालफितीचा कारभार आणि अपुऱ्या गुंतवणुकीमुळे एअर इंडिया शेवटच्या घटका मोजत होती. मात्र, आता इंडिगो आणि एमिरात कंपनीकडील ग्राहक खेचून घेण्यासाठी एअर इंडियाचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रत्येक फ्लाइटमधून उत्पन्न वाढणार
प्रवाशांची मागणी आणि तिकिटांचे दर यांचा मेळ घालण्यासाठी नवी सॉफ्टवेअर प्रणाली फायद्याची ठरेल, असे एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यापूर्वी प्रत्येक फ्लाइट आणि सीटसाठी तिकिटाचे दर एकदाच निश्चित केले जात असत. मात्र, नव्या प्रणालीनुसार हे दर सतत बदलत राहतील. प्रवासी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक प्रवास करतात, तसेच किती पैसे खर्च करण्यास तयार असतील, याचा अंदाज चॅट जीपीटीद्वारे बांधण्यात येईल.
मागील वर्षी ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत एअर इंडियाचा आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीतील वाटा 28% होता. देशांतर्गत प्रवासी वाहतुकीतही एअर इंडियाचा टक्का वाढत आहे. टाटा ग्रुपची दुसरी कंपनी विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलगीकरण करण्यात येणार आहे. तेव्हा ही आकडेवारी आणखी वाढेल.