Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold Mines Found in India : लिथिअम साठ्यानंतर आता ‘इथं’ सापडल्या सोन्याच्या खाणी

Gold Mines

अलीकडेच जम्मू आणि काश्मीरमध्ये लिथिअम साठा सापडला होता. इलेक्ट्रिक बाजारपेठेच्या दिशेनं जाताना ही बातमी सकारात्मकच होती. आता ‘या’ राज्यात काही सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. सरकारने त्यांचा ताबाही घेतला आहे

जम्मू आणि काश्मीरमध्ये लिथियम साठा (Lithium found in India) नंतर आता देशात सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत (Gold Mines in India). या सोन्याचा खाणी ओडिशातल्या 3 जिल्ह्यांमध्ये सापडल्या आहेत.

ANI ने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण म्हणजेच Geological Survey of India (GSI) च्या सर्वेक्षणात ओडिशातील तीन जिल्ह्यांमध्ये सोन्याचा साठा आढळून आला आहे. ओडिशाचे खाण मंत्री प्रफुल्ल मलिक यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं की, ‘देवगड (Deogarh), केओंझार (Keonjhar) आणि मयूरभंज (Mayurbhanj) जिल्ह्यात या सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत.’

कुठे सापडले सोन्याचे साठे?

मयूरभंजमध्ये चार ठिकाणी, देवगडमध्ये एक आणि केओंझरमध्ये चार ठिकाणी या सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. यामध्ये मयूरभंज जिल्ह्यातील सूर्यगुडा, रुआनसिला, धुशुरा पहारी आणि जोशीपुरा भागांचा समावेश आहे.

आडस, केओंझार, दिमिरमुंडा, कुष्कला, गोटीपूर आणि गोपूर येथे या सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. याशिवाय प्रफुल्ल मलिक यांनी आपल्या उत्तरात असेही म्हटले आहे की, ‘GSI ने 1970 आणि 1980 मध्ये या विषयावर अभ्यास केला होता. परंतु अधिकाऱ्यांनी सेवा सर्वेक्षणाचा निकाल जाहीर केला नव्हता.’

मात्र मागच्या दोन वर्षांमध्ये ओडिशातल्या जमिनीचा मोठ्या प्रमाणावर सर्व्हे करण्यात आला. आणि त्यानंतर ही माहिती मिळाली. अर्थात, नेमकं किती सोनं तिथं असू शकेल हे ओडिशा सरकारने स्पष्ट केलं नाही.

gold-reserves-in-india.jpg

भारतात ‘पांढऱ्या सोन्याच्या खाणी’ देखील सापडल्या!

काही दिवसांपूर्वी भारतात लिथियमचे साठे सापडले आहेत. जम्मू-काश्मीरच्या रियासीमध्ये (Lithium Reserves in Jammu Kashmir) हे साठे आढळून आले आहेत.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण म्हणजेच GSI नुसार, हा साठा 59 लाख टन लिथियमचा आहे. लिथियमला 'पांढरे सोने' देखील म्हणतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात लिथियम मिळाल्यानंतर भारताला त्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही.

अख्खं जग हरित ऊर्जेच्या दिशेनं जात असताना वीज साठवण्यासाठी बॅटरींची गरज पडणार आहे. आणि या बॅटरीमध्ये लिथिअम वापरलं जातं. भारत इतके दिवस लिथिअमसाठी तैवान आणि चीनवर अवलंबून होता. तसा तो अजूनही असणार आहे. पण, जम्मू काश्मीरमधल्या शोधानंतर हे अवलंबित्व नक्की कमी होईल.

सोन्याचा शोध किती महत्त्वाचा?

भारत सोन्याचा प्रमुख उत्पादक नाही आणि भारतातील सोन्याच्या खाणी मर्यादित आहेत. भारतातील सोन्याचे उत्पादन प्रामुख्याने कर्नाटकातील हुट्टी (Hutti Gold Mines) आणि जवळच कोलार गोल्ड फील्ड्स (Kolar Gold Fields) पुरतं मर्यादित आहे. या दोन खाणी एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणींपैकी होत्या, ज्यातून सुमारे 938 टन सोन्याचे उत्पादन झाले होते.

पण, हळूहळू इथलं सोनं कमी झालं. सध्या, भारतात सोन्याच्या तीन खाणी कार्यरत आहेत, कर्नाटकातील हुट्टी आणि उटी गोल्ड माईन (UTI Gold Mine) आणि झारखंडमधील हिराबुद्दिनी खाण (Hira-Buddini Gold Mine).

कर्नाटकातील हुट्टी येथील सोन्याची खाण ही गेल्या शंभर वर्षांपासून कार्यरत आहे. या खाणीतून दरवर्षी सुमारे 3 टन सोन्याचे उत्पादन निघते आणि या खाणीत अंदाजे 24 टन सोन्याचा साठा आहे. कोलार गोल्ड फील्ड्स एकेकाळी जगातील सर्वात खोल सोन्याच्या खाणी होत्या, परंतु उच्च परिचालन खर्चामुळे (High Operation Cost) त्या 2001 पासून बंद आहेत.

या दोन खाणींव्यतिरिक्त, भारतात काही लहान सोन्याच्या खाणी आहेत, जसे की उत्तर प्रदेशातील सोनभद्र गोल्ड फील्ड (Sonbhadra Gold Deposite) आणि छत्तीसगडमधील बघमारा गोल्ड फील्ड (Baghmara Gold Mines, Chhattisgarh). मात्र, विविध कारणांमुळे या खाणी सध्या कार्यरत नाहीत.

भारताचे सोन्याचे मर्यादित उत्पादन आहे. त्यामुळे आपल्याला बहुतांश सोनं आयात करावं लागतं. डॉलरच्या वाढत्या किमतीमुळे सोनं आयात करणं आणखी महाग झालं होतं. त्यामुळे गेल्या काही वर्षांत सरकारने देशातर्गत सोनं शोधायला नव्या जोमाने सुरुवात केली.

देशातली गरज आणि उत्पादन यांची वाढती तफावत

भारतीय लोक वर्षाला 774 टन सोन्याची खरेदी करतात मात्र तुलनेने भारतात सोन्याचे उत्पादन वर्षाला सुमारे 1.6 टन इतके अल्प आहे.

सोन्यासारख्या मौल्यवान धातूची वाढती मागणी आणि वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्राला देशात सोन्याचे उत्पादन वाढवायचे आहे. गेल्या वर्षी, NITI आयोगाने देशातील संभाव्य सोन्याच्या खाणी शोधण्यासाठी विस्तृत अभ्यास केला होता आणि त्यावर मोहीम सुरू केली होती. सध्या, भारतातील सोन्याचा साठा एकूण 70.1t (4.1g/t वर 17.2Mt) आहे, खाण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार. सोन्याचा सर्वाधिक साठा दक्षिण भारतात आहे. पैकी 88 टक्के साठा एकट्या कर्नाटकात आहे.

जागतिक सुवर्ण परिषदेने (World Gold Council) गेल्या वर्षी एका अहवालात असे नमूद केले होते की सोन्याच्या खाणींन पायाभूत सुविधा प्रदान केल्यास तसेच खणीकर्मासंबंधी कायद्यात सुधारणा केल्यास भारत आपले सोन्याचे उत्पादन वर्षाला 20  टनांपर्यंत वाढवू शकतो.