• 07 Dec, 2022 09:21

Haldiram Plans for IPO: बिकाजी फूड्सनंतर आता 'हल्दीराम'चा IPO येणार

Haldiram IPO, IPO, Bikaji

Haldiram Plans for IPO: बिकाजी आणि हल्दीराम दोघांची सुरूवात एकाच कुटुंबातून झाली. चार सख्खे भाऊ या दोन्ही कंपन्यांचे मालक आहेत. चार भावांचे आजोबा गंगा बिशन अग्रवाल यांनी 1982 मध्ये मूळ हल्दीराम कंपनीची स्थापना केली होती.

शेअर मार्केटमध्ये बिकाजी फुड्सला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर नमकीन बिझनेसमधील प्रतिस्पर्धी कंपनी 'हल्दीराम'सुद्धा IPO आणण्याची तयारी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीओपूर्वी हल्दीराम परिवार नागपूर आणि दिल्ली मुख्यालयातील व्यवसायांचे एकत्रीकरण करुन एक संयुक्त कंपनी बनवण्याची योजना आखत आहेत. दोन्ही बाजूने विलीनीकरणाबाबत चाचपणी सुरु केली असून पुढील वर्षभरात हे विलिनीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. हल्दीरामचा पब्लिक इश्यू पुढील 18 महिन्यात येण्याची शक्यता आहे. 

एकाच कुटुंबातून हल्दीराम आणि बिकाजीची सुरुवात

बिकाजी आणि हल्दीराम दोघांची सुरूवात एकाच कुटुंबातून झाली. चार सख्खे भाऊ या दोन्ही कंपन्यांचे मालक आहेत. चार भावांचे आजोबा गंगा बिशन अग्रवाल यांनी 1982 मध्ये मूळ हल्दीराम कंपनीची स्थापना केली होती. सर्वात मोठा भाऊ शिव किशन अग्रवाल, हे नागपूर मुख्यालय असलेल्या हल्दीराम स्नॅक्स चालवतात, जिची पश्चिम आणि दक्षिण भारताच्या मार्केटवर मजबूत पकड आहे. तर दिल्ली मुख्यालय असलेली संस्था- हल्दीराम फुड्स इंटरनॅशनलला मनोहर आणि मधूसुदन अग्रवाल हे दोन भाऊ मिळून चालवतात.

बिकाजी फुड्सचे प्रमुख आहेत अग्रवाल कुटुंबातले चौथे भाऊ

चौथे भाऊ शिव रतन अग्रवाल, बिकाजी फुड्स इंटरनॅशनलचे मालक आहेत. बिकाजी फुड्सच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून भव्य प्रतिसाद मिळाला. बिकाजीचा आयपीओ 7 नोव्हेंबरला बंद झाला. याला गुंतवणूकदारांकडून सुमारे 26.67 पट अधिक सब्सक्रिप्शन मिळाले.

हल्दीरामकडे एथनिक स्नॅक्सचा बाजारातील 48.5% हिस्सा

हल्दीरामच्या संभाव्य आयपीओवर बाजाराचे बारकाईने लक्ष असेल. Frost and Sullivan तर्फे नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले त्यानुसार, भारतीय एथनिक स्नॅक्स मार्केटचा जवळपास 48.5% हिश्श्यावर दोन्ही हल्दीराम कंपन्यांचा संयुक्तरित्या कब्जा आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये दोन्ही हल्दीराम कंपन्यांचा एकत्रित महसूल 9,000 कोटी रुपये होता. याच आर्थिक वर्षात बिकाजी फूड्सच्या 1600 कोटी रुपयांच्या महसुलापेक्षा हे कित्येक पटींनी जास्त आहे.

बिकाजीच्या IPO ला चांगला प्रतिसाद मिळाला

बिकाजी कंपनीच्या IPO ला चांगला प्रतिसाद मिळाला. IPO मधून बिकाजीने 881 कोटी रुपयांचे भांडवल उभारले. कंपनीचा आयपीओ 3 ते 7 नोव्हेंबरपर्यंत सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला होता. कंपनीने या आयपीओसाठी 285-300 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला होता. आणि तो गुंतवणूकदारांनी सहज स्विकारला होता. या आयपीओला एकूण 26.67 पट सब्सक्रिप्शन मिळाले. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) या श्रेणीमध्ये हा आयपीओ 80.6 पट सब्सक्राइब झाला. त्याच वेळी, हा आयपीओ गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या श्रेणीमध्ये 7.1 पट, किरकोळ विक्रेत्यांच्या श्रेणीमध्ये 4.77 पट आणि कर्मचाऱ्यांच्या श्रेणीमध्ये 4.38 पटीने सब्सक्राइब झाला.