लोक कल्याणकारी योजना आणण्यासाठी सरकार कायम प्रयत्नशील असते. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून केंद्र सरकारने अशीच एक योजना आणली आहे ज्याचा फायदा देशभरातील लाखो सामान्य नागरिकांना होणार आहे. भारतीय रेल्वेने देशभरातील अनेक स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांसाठी प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र (PMBJK) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या जन औषधी केंद्रावर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वस्त दरात आवश्यक त्या औषधी खरेदी करता येणार आहे. या औषधी केंद्रात ‘जेनेरिक औषधे’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Table of contents [Show]
रेल्वे फलाटावर असेल केंद्र!
अनेकदा प्रवाशांना प्रवासादरम्यान सर्दी, डोकेदुखी, खोकला, सामान्य ताप यांसारख्या आजारांशी सामना करावा लागतो. अशावेळी प्रवासात असल्यामुळे त्यांना औषधी मिळणे कठीण होऊन बसते. या पार्श्वभूमीवर रेल्वे फलाटावरच प्रवाशांना आता परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार औषधे आणि जनऔषधी उत्पादने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
पहिल्या टप्प्यात 50 स्थानकांवर सुविधा
सध्या या योजनेसाठी पायलट प्रोजेक्ट अंतर्गत देशभरातील 50 स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या 50 रेल्वे स्थानकांवर हा प्रयोग केला जाणार असून, त्याद्वारे नागरिकांचा यासाठी कसा प्रतिसाद मिळतो, त्यांच्या गरजा काय हे तपासले जाणार आहे. त्यांनतर हळूहळू इतर स्थानकांवर या औषधी केंद्रांचा विस्तार केला जाणार आहे. या औषधी केंद्रांच्या निमित्ताने स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध होईल असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.
आउटलेट फक्त व्यावसायिक परवानाधारकांनाच
प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र (PMBJK) योजनेंतर्गत, रेल्वे स्थानकांवर उभारले जाणारे हे केंद्र चालवण्यासाठी परवानाधारक व्यावसायिकांचीच नियुक्ती केली जाणार आहे. औषध निर्माण अभ्यासक्रम (B.Pharm, D.Pharm) पूर्ण केलेले आणि परवानाधारक व्यावसायिक यासाठी पात्र असतील. शासनाच्या सर्व अटींचे पालन करणे त्यांच्यासाठी बंधनकारक असणार आहे.
इथे सुरु होणार केंद्र
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील काही निवडक रेल्वे स्थानकांवर ही केंद्र सुरू केली जाणार आहेत. यात तिरुपती, न्यू तिनसुकिया, लुमडिंग, रंगिया, दरभंगा, पटना, कटिहार, जांजगीर-नैला, बागबहरा, आनंद विहार, अंकलेश्वर, महेसाणा जंक्शन, सिनी जंक्शन, श्रीनगर, एसएमव्हीटी बेंगळुरू, बंगारापेट, म्हैसूर, हुब्बल्ली जंक्शन, पलक्कड, पलक्कड, पी. , मदन महल, बिना, लोकमान्य टिळक टर्मिनस, मनमाड, पिंपरी, सोलापूर, नैनपूर, नागभीर, मालाड, खुर्दा रोड, फगवारा, राजपुरा, सवाई माधोपूर, भगत की कोठी, तिरुचिरापल्ली, इरोड, दिंडीगुल, सिकंदराबाद, पंडित दीनदयाल उपनगर लक्ष्मीबाई जंक्शन, लखनौ जंक्शन, गोरखपूर जंक्शन, बनारस, आग्रा कॅंट, मथुरा जंक्शन, योगनगरी ऋषिकेश, काशीपूर, मालदा टाउन आणि खरगपूर या स्थानकांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील स्थानक
महाराष्ट्रातील आणि मुंबईतील महत्वाचे समजले जाणारे लोकमान्य टिळक टर्मिनसवर हे केंद्र उभारले जाणार आहे. तसेच मनमाड जंक्शनवर, पिंपरी स्टेशन, सोलापूर स्टेशन इथे देखील जन औषधी केंद्र खुले होणार आहे.