भारतातील अनेक राज्यांमध्ये सेवानिवृत्ती वय वाढवण्याची मागणी केली जात आहे. काही राज्यांमध्ये सध्या निवृत्ती वय हे 58 वर्ष, तर काही राज्यांमध्ये 60 वर्ष आहे. यामध्ये वाढ करण्याची मागणी सरकारी कर्मचाऱ्यांकडून वारंवार केली जाते. महाराष्ट्रातही सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवावे अशी मागणी केली जात आहे. निवृत्ती वय 58 वरून 60 करावे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. परंतु, सेवानिवृत्तीच्या वयात वाढ केल्यास अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम पाहायला मिळू शकतात.
भारतात 15 ते 59 वयोगटातील कार्यकारी लोकसंख्येचा आकडा मोठा आहे. मागील 7 वर्षांमध्ये कार्यकारी लोकसंख्येचे प्रमाण 65 टक्क्यांवर पोहचले आहे. मात्र, 2050 पर्यंत वृद्ध नागरिकांचे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत पोहचू शकते. त्यामुळे सेवानिवृत्तीचे वय वाढवणे खरचं फायदेशीर ठरू शकते? याविषयी जाणून घेऊया.
सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचे फायदे
अर्थव्यवस्थेला फायदा | सेवानिवृत्तीचे वय वाढवणे अर्थव्यवस्थेसाठी सर्वाधिक फायदेशीर ठरू शकते. यामुळे विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कुशल व अनुभवी कामगार उपलब्ध होतात. तसेच, यामुळे करात देखील वाढ होईल. नियमित रोजगारामुळे सरकारी महसुलातील कर्मचाऱ्यांचे कराच्या स्वरुपातील योगदान वाढते. |
कार्यकारी लोकसंख्येत वाढ | भारत व चीन सारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांना लोकसंख्या लाभांशांचा (Demographic Dividend) मोठा फायदा झाला आहे. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीत देखील कार्यकारी लोकसंख्येचा वाटा महत्त्वाचा आहे. निवृत्तीचे वय वाढवल्याने कार्यकारी लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेतील सहभाग आणखी काही वर्ष कायम राहील. |
पेन्शन बचत | निवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना नियमितपणे पेन्शनचा लाभ मिळतो. मात्र, निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन सरकारसाठी खर्च असतो. निवृत्तीचे वय दोन ते पाच वर्षांनी वाढवल्यास पेन्शनवर होणारा खर्च वाचू शकतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर पेन्शनचा अतिरिक्त भार पडणार नाही. |
निवृत्तीसाठी अधिक बचत | निवृत्तीचे वय वाढवल्यास कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होऊ शकतो. यामुळे निवृत्तीनंतरचे आयुष्य आरामात घालविण्यासाठी जास्तीत जास्त पैसा जमा करण्यास मदत होईल. याशिवाय, काम करत असताना कंपनीकडून मिळणाऱ्या आरोग्य विम्याचा देखील फायदा मिळले. नोकरी करताना आरोग्य विम्याचा प्रीमियम देखील भरू शकता. |
सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचे तोटे
आरोग्यावर परिणाम | वाढत्या वयासोबतच आरोग्य समस्या देखील जाणवतात. अशावेळी वृद्ध नागरिकांना कामाच्या तणावामुळे विविध आरोग्य समस्येचा सामना करावा लागू शकतो. याचा परिणाम त्यांच्या कामावर होऊ शकतो. त्यामुळे असे कर्मचारी लवकर निवृत्त झाल्यास त्यांच्याजागी इतर कुशल कामगारांना संधी मिळू शकते. |
बेरोजगारीत होईल वाढ | निवृत्तीचे वय वाढवल्यास नव्याने नोकरी शोधत असलेल्या तरूणांसाठी रोजगाराच्या खूप कमी संधी उपलब्ध होतील. यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढू शकते. |
वेतन खर्च | नियुक्तीपासून निवृत्तीपर्यंत सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात अनेक पटींनी वाढ झालेली असते. त्यामुळे निवृत्तीचे वय वाढवल्यास सरकारला अशा कर्मचाऱ्यांच्या पगारावर अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतात. त्या तुलनेत नव्याने नोकरी शोधत असलेल्या तरूणांना संधी दिल्यास पगारावर होणारा मोठा खर्च वाचू शकतो. |