Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vanity Van: मनोरंजन क्षेत्रासाठी व्हॅनिटी व्हॅनचा पुरवठा करणाऱ्या उद्योगात पुण्याच्या तरुणाची यशस्वी भरारी!

Vanity Van on Rent

Image Source : www.yashaswiudyojak.com

Vanity Van Business: मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेते आणि अभिनेत्रींना व्हॅनिटी व्हॅनची सुविधा पुरवण्याचा अनोखा उद्योग पुण्यातील एका तरुणाने सुरू केलाय. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये कोणत्या सोयी-सुविधा असतात. त्याचे दर कसे असतात, अशा सर्व गोष्टी आज आपण उद्योजक कौस्तुभ सोरटे (Kaustubh Sorte) यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

Vanity Van Business: प्रेक्षकांसमोर आनंदी, तजेलदार दिसण्यासाठी जितकी अभिनेत्यांची मेहनत असते, तितकीच किंवा त्याहून अधिक पडद्यामागील कलाकारांची असते. चित्रपटसृष्टी बाहेरून अत्यंत आकर्षक, सर्वांत जास्त प्रसिद्धी मिळणारी वाटत असली तरीही पडद्यामागे काम करणारे असंख्य लोक रोजच्या मेहनतीने चित्रपटसृष्टीला प्रसिद्धी मिळवून देण्याचे काम करत असतात. पडद्यावरील तांत्रिक बाबी असोत किंवा कलाकाराला घडवण्यासाठी केलेला मेकअप किंवा कपड्यांची निवड असो, या सर्व गोष्टींसाठी प्रत्येकजण काम करत असतात. अशात, कलाकारांच्या सोयीसाठी असणारी  व्हॅनिटी व्हॅन सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत असते.

मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेते आणि अभिनेत्रींना व्हॅनिटी व्हॅनची सुविधा पुरवली जाते. शुटींग दरम्यान कुठे प्रवास करायचा असेल, किंवा शुटींग मधून वेळ मिळेल तेव्हा आराम करायचा असेल, शुटींगचा मेकअप असो किंवा स्क्रिप्टचे वाचन असो या सर्व गोष्टी व्हॅनिटी व्हॅन मध्येच केल्या जातात. मग या  व्हॅनिटी व्हॅन कोणाकडून पुरवल्या जातात? त्यांच्या कोण-कोणत्या सोयी असतात? त्यांचे दर किती असतात? अशा प्रश्नांच्या उत्तरासाठी या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कौस्तुभ सोरटे (Kaustubh Sorte) यांच्याकडून व्हॅनिटी व्हॅनच्या उद्योगाची माहिती जाणून घेऊया.

व्हॅनिटी व्हॅन - चालतेफिरते घर!

पुण्यात होणार्‍या चित्रीकरणांना पुण्यातील तरुण उद्योजक कौस्तुभ सोरटे व्हॅनिटी व्हॅनचा पुरवठा करतात. निसर्गाच्या सान्निध्यात आऊटडोअर चित्रीकरण असल्यास कलाकारांसाठी व्हॅनिटी व्हॅनची गरज भासते. त्यांची वेशभूषा, रंगभूषा, विश्रांती तसेच गरज असल्यास एखादी मीटिंगही व्हॅनिटी व्हॅनमध्ये होते.

व्हॅनिटी व्हॅनमध्ये सिंगल डोअर, डबल डोअर व ट्रिपल डोअर असे तीन प्रकार उपलब्ध आहेत. सिंगल डोअर व्हॅनिटी व्हॅन एका कलाकारासाठी वापरली जाते. डबल डोअर व ट्रिपल डोअरमध्ये अनुक्रमे दोन व तीन कलाकारांची व्यवस्था होते. प्रत्येक कलाकारासाठी स्वतंत्र खोली वापरली जाते. टॉयलेट, बाथरूम, कपाट, बाहेरील व्यक्ती आली तर बसण्यासाठी सोफा, खुर्च्या, मेकअपसाठी आरसा व मेकअप चेअर, वातानुकूलित यंत्रणा, टीव्ही अशा सर्व सुखसोयींनी युक्त अशी व्हॅनिटी व्हॅनची रचना असते. व्हॅनिटी व्हॅनच्या प्रत्येक खोलीमध्ये कलाकारांसाठी स्वतंत्र सोयी-सुविधा उपलब्ध असतात. अशी माहिती या व्यवसायाचे स्वरूप आणि संधींविषयी बोलताना कौस्तुभ यांनी सांगितली.

Kaustubh Sorte Vanity Van
व्हॅनिटी व्हॅनमधील रुमचा फोटो.  Image Source: www.instagram.com

कौस्तुभ पूर्वी चित्रीकरण स्थळांवर प्रकाशयोजना, प्रॉडक्शन अशी कामे करत असे. ते करताना चित्रीकरणाच्या जागी त्यांना व्हॅनिटी व्हॅन दिसायची. या व्हॅनबाबत त्यांना कुतूहल असायचे. शेवटी त्यांनी त्या कुतूहलातूनच 2011 मध्ये व्हॅनिटी व्हॅनच्या व्यावसायात पाऊल टाकले.

व्यवसायाची पहिली सुरूवात 6 लाखांपासून

कौस्तुभ यांनी  या व्यवसायात उतरताना सर्वांत पहिली गुंतवणूक 6 लाख रुपयांची (Cost of Vanity Van) केली होती. 2011 मध्ये कौस्तुभ यांनी बॉलिवूडमधील हिंदी सिनेअभिनेता जॉन अब्राहम (John Abraham, Bollywood Actor)  यांची सिंगल डोअर व्हॅनिटी व्हॅन कौस्तुभने विकत घेऊन या व्यवसायाची सुरूवात केली. त्यानंतर लगेच 6 महिन्यात कौस्तुभकडे डबल डोअर व्हॅनिटी व्हॅनची विचारणा होऊ लागली. ही मागणी लक्षात घेऊन कौस्तुभने 18 लाख रुपयांची गुंतवणूक करून डबल डोअर व्हॅनिटी व्हॅन विकत घेतली.  

11 वर्षांनंतर 19 लाखांची गुंतवणूक 

कौस्तुभने 2011 नंतर तब्बल 11 वर्षांनी म्हणजे 2022 मध्ये व्यवसायात 19 लाख रुपयांची नव्याने गुंतवणूक केली. ही गुंतवणूक मागणी आणि सोयीसुविधा यांना धरून असल्यामुळे त्याचा पुरवठा करणे गरजेचे असते.  सुरूवातीला या व्यवसायात उतरण्यासाठी किती मोठी गुंतवणूक करावी लागते, याची माहिती या व्यवसायात येणार्‍या नवीन लोकांना कळावी म्हणून जाणीवपूर्वक कौस्तुभ यांनी ही आकडेवारी सांगितली.

व्हॅनिटी व्हॅनचे दिवसाचे दर

सिंगल डोअर व्हॅनिटी व्हॅनचे प्रत्येक दिवसाचे भाडे साधारण 4500 रुपये (Vanity Van on Rent) असते. डबल आणि ट्रिपल डोअर व्हॅनिटी व्हॅनसाठी अनुक्रमे 5000 आणि 6000 रुपये आकारले जातात. यात डिझेलचे पैसे वेगळे द्यावे लागतात. एका व्हॅनिटी व्हॅनसाठी एक चालक आणि एक ऑपरेटर असे दोनजण  असतात. त्यामुळे कौस्तुभकडे सध्या सहा लोक कामाला आहेत.

सिंगल डोअर व्हॅनिटीला जास्त मागणी

कौस्तुभ सध्या पुण्यातील पाच-सहा निर्मिती संस्थासोबत काम करत आहे. कोणत्याही भाषेतील चित्रपट, गाण्यांचे अल्बम, मालिका, वेब सिरीज, जाहिरात यांचे चित्रीकरण असल्यास त्यांच्याकडून व्हॅनिटी व्हॅनची मागणी येते. दिवसांच्या संख्येनुसार व्हॅनिटी व्हॅनचे पैसे आकारले जातात. चित्रपटाच्या चित्रीकरणाला सलग काही दिवस व्हॅनिटी व्हॅन लागते. अशावेळी प्रत्येक दिवसाच्या दरात सवलत दिली जाते. सिंगल डोअर व्हॅनिटीला काही चित्रीकरणांच्या वेळी खूप मागणी असते. आकाराने ती छोटी असल्याने ज्या ठिकाणी मोठ्या गाड्या जात नाहीत, त्या ठिकाणी पाठवायला सोयीस्कर ठरते.

व्हॅनिटी व्हॅनवर येणारा खर्च किती?

व्हॅनिटी व्हॅनमधील वातानुकूलित यंत्रणेत (Air Conditioner) बिघाड झाल्यास किंवा व्हॅनची चाके बदलायची असतील तर खूप खर्च येतो. दर वर्षी आरटीओकडे लाखो रुपयांचा टॅक्स भरावा लागतो. त्याचबरोबर इन्शुरन्स, दर दोन वर्षांनी परवान्याचे नूतनीकरण असे व्हॅनिटी व्हॅनचे खर्च असतात. पावसाळ्यात बऱ्यादा शुटिंग बंद असल्याने काम कमी मिळते. पण तरीही व्हॅनचे सर्व्हिसिंग या काळात करावेच लागते.

या क्षेत्रात संधी किती आहे?

पुण्यासारख्या शहरात या व्यवसायात येणाऱ्या नवीन लोकांना बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. पुणे शहराबरोबरच आजूबाजुच्या जिल्ह्याच्या ठिकाणी शुटिंग असल्यास त्याला मोठी मागणी मिळू शकते. त्याचबरोबर आजकाल जाहीर सभा आणि मोठमोठ्या कार्यक्रमांसाठी व्हॅनिटी व्हॅनला मागणी असते.

मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी शहरांमध्ये व्हॅनिटी व्हॅनचा पुरवठा करणारे उद्योजक आहेत. पण राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये अशी सोयीसुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे या व्यवसायाला भरपूर स्कोप आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कायम चित्रीकरण सुरू असते. त्यामळे ज्यांना या क्षेत्राची आवड आहे; त्यांनी याचा विचार करावा, असे तरुण उद्योजक कौस्तुभ सोरटे यांनी सांगितले.

स्त्रोत: यशस्वी उद्योजक