भारतात आपल्याकडे आजही सार्वजनिक स्वच्छता आणि वैयक्तिक घरातील स्वच्छता ही वेगवेगळी मानली जाते. पण आपल्या प्रत्येकाच्या घरातलाच कचरा सार्वजनिक होत असतो; याची आपल्याला जाणीव नसते. हा कचरा नेहमीचा असेल तर ठीक. पण काहीवेळेस वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स हे जेव्हा घरात कचरा म्हणून असतात. तेव्हा त्याबद्दल आपण हायजिनच्या दृष्टीने भरपूर काळजी घेतो. पण तोच कचरा जेव्हा सार्वजनिक ठिकाणी टाकतो. तेव्हा मात्र आपण त्याकडे सोयिस्करपणे कानाडोळा करतो. हाच धागा पकडत अनिता माने यांनी सार्वजनिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे ही सुद्धा आपली सामाजिक जबाबदारी आहे, हे लक्षात घेऊन सॅनिटरी नॅपकिन्स आणि डायपर्ससारख्या कचऱ्याच्या वर्गीकरणाचा मुद्दा हाती घेतला आहे.
अनिता माने यांनी या सामाजिक मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करून, त्यात आवश्यक बदल करून या सामाजिक भानाला ‘स्मॉल स्केल बिझनेस’मध्ये रुपांतर केले. त्यांनी ‘वेस्ट पिकर्स’ (Waste Pickers) या संस्थेला मदत म्हणून ‘रेड डॉट बॅग’ (Red Dot Bag) ही संकल्पनेला पाठिंबा देत या समाजप्रबोधनाच्या कामात उतरल्या. या ‘रेड डॉट बॅग’मुळे कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास मदत तर होतेच पण आरोग्याच्या समस्याही दूर ठेवण्यास मदत होते.
सुरूवातीच्या काळात अनिता यांनी सोसायटीमधील सॅनिटरी नॅपकिन्स आणि डायपरच्या (Sanitary Napkins & Diaper) वर्गीकरणाची मोठी समस्या होती. त्यावेळी त्यांचा ‘व्हिजन क्लिन एजन्सी’शी संपर्क झाला. या संस्थेने ‘रेड डॉट बॅग’ तयार करून हा प्रश्न मार्गी लावला. पण अनिता यांना या संस्थेचे काम आणि पर्याय खूपच आवडला. त्यामुळे त्यांनी या संस्थेसोबतच काम करण्याचा मार्ग स्वीकारला. त्यांनी आपल्या सोसायटीतील सदस्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन या बॅगेची माहिती इतरांना सांगण्यास सुरूवात केली. ही बॅग एनव्हलपसारखी असून त्यावर मोठा लाल रंगाचा ठिपका असतो. या बॅगेत सॅनिटरी नॅपकिन्स आणि डायपर्स टाकले जातात. या पिशवीवरील लाल रंगामुळे हे सॅनिटरी वेस्ट असल्याचे लगेच समजते. तसेच ही बॅग कागदी असून ती पर्यावरणाला अनुकूल आहे.
अनिता यांनी जुलै 2020 पासून या कामात स्वत:ला झोकून घेतले. त्यांनी अनेक सोसायट्यांमध्ये याबाबत माहिती देऊन या दोन वर्षांत सुमारे 25 हजार डझन बॅगांची विक्री केली. आताही त्या प्रत्येक महिन्याला किमान 1 हजार डझन बॅगांची विक्री करत आहे. त्यांच्या या कामाचा व्याप वाढल्यामुळे त्यांनी एका कुरिअर कंपनीशी टायअप करून लोकांना घरपोच सेवा देत आहेत.
अनिता माने या आता वेगवेगळ्या पद्धतीने या बॅगा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी अनेक सोसायट्यांमध्ये अवेअरनेस प्रोग्रॅम घ्यायला सुरूवात केली. यावर त्या सोसायट्यांमध्ये प्रेझेंटेशन देऊ लागल्या. याचा त्यांना चांगला फायदा होऊ लागला. ज्या सोसायट्यांमधून अवेरनेस कार्यक्रम होत होते. तिथून अनिता यांना बॅग्ससाठी ऑर्डर येऊ लागल्या. हळुहळू त्यांनाच अनेक सोसायट्यांकडून बोलवणे येऊ लागले. यातून रेड डॉट बॅगची विक्री वाढू लागली. आता त्यांच्या बॅग्सना महाराष्ट्राच्या बाहेरूनही मागणी येऊ लागली आहे. बरीच कुटुंबे परदेशात जाताना या बॅग्सला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे हा बॅगा आता सातासमुद्रापार पोहोचू लागल्या आहेत.
स्त्रोत: यशस्वी उद्योजक