Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Farmer Success Story : शेतीला जोडून उभारला प्लॅस्टिक क्रेटचा उद्योग; अवघ्या काही वर्षांत कंपनीची उलाढाल 5 कोटींवर

Farmer Success Story

Farmer Success Story : शेती हा व्यवसाय करत असताना अनेकांकडून हेच ऐकायला येते की, शेती परवडत नाही. यात मेहनत खूप आणि मोबदला कमी मिळतो. पण, काही शेतकरी असे असतात, जे कारणं न देता त्यात अधिक मेहनत घेऊन त्यातूनच विविध व्यवसायाची उभारणी करतात. असेच अमरावती जिल्ह्यातील प्रगतीशील उद्धवराव फुटाणे यांच्याबद्दल आणि त्यांच्या शेतीवर आधारित प्रयोगांबद्दल जाणून घेणार आहोत.

Farmer Success Story : महाराष्ट्रातील सर्वाधिक संत्रा लागवड होणारा भाग म्हणजे अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी तालुका. संत्रा या पिकाखालील एकूण 1 लाख 50 हजार हेक्‍टरपैकी सुमारे 1 लाख हेक्‍टर क्षेत्र या दोन तालुक्‍यांनीच व्यापले आहे. त्यामुळेच संत्र्याच्या बाबतीत या भागाला विदर्भाचा कॅलिफोर्निया असे नाव देण्यात आले आहे. याच संत्रा पिकाच्या आधारावर येथील अनेक शेतकरी मोठे झाले आहेत. 

यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांपैकीच एक म्हणजे, शेंदूरजनाघाट (ता. वरुड, जि. अमरावती) येथील उद्धवराव फुटाणे. उद्धवराव यांची संपूर्ण अमरावती जिल्ह्यात प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख आहे. वडिलांच्या काळापासून त्यांचा नर्सरीचा व्यवसाय सुरू आहे. नर्सरीमध्ये ते पनेरी म्हणजेच संत्राच्या छोट्या झाडांची विक्री करतात. त्याचबरोबर 2017 मध्ये उद्धवराव यांनी मुलांना हाताशी धरून माऊली प्लॅस्टिक कंपनीची स्थापना केली. त्यासोबतच संत्रा मंडीसुद्धा उभारली आहे. शेतीमध्ये मिळणाऱ्या उत्पन्नातूनच त्यांनी हे व्यवसाय उभे केले आहेत. त्यांच्या शेतीतून व्यवसायाकडे वळलेल्या प्रवासाबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.

internal-image-7-1.jpg
पनेरी म्हणजेच संत्राचे कलम 

शेतीच्या आधारावरच उभी केली माऊली प्लॅस्टिक कंपनी

एकेकाळी उद्धवराव फुटाणे यांच्याकडे अवघी 3 ते 4 एकर शेती होती. त्याच शेतीत मेहनत करून फुटाणे यांनी टप्प्याटप्प्याने 60 एकर शेती विकत घेतली. 4 एकरावरून 60 एकर शेतीपर्यंतचा उद्धवरावांचा प्रवास फारच खडतर आहे. त्यांनी एकाच व्यवसायाला धरून न बसता अनेक व्यवसाय केले. त्यांच्या या विविध व्यावसायामुळे गावातील 100 जणांना रोजगार ही उपलब्ध झाला आहे.

internal-image-3-1.jpg
क्रेट तयार करण्यासाठी वापरली जाणारी मशीन 

माऊली प्लॅस्टिक प्रायव्हेट लिमिटेड शेंदूरजनाघाटचे मॅनेजर निखिल कराळे यांच्याशी ‘महामनी’ने बातचीत केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, 2017 मध्ये आम्ही या कंपनीची स्थापना केली. आमच्या भागामध्ये भरपूर प्रमाणात संत्रा उत्पादन होते. तो संत्रा बाहेर पाठवण्यासाठी क्रेटची आवश्यकता असायची. ते क्रेट आम्हाला बाहेरून आणावे लागत होते. पण ते शेतकऱ्यांना परवडणारे नव्हते. मग, तेव्हा आम्हाला कल्पना सुचली की, प्लॅस्टिक कंपनी स्थापन करून आपण आपल्या भागातील शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत क्रेट उपलब्ध करून देऊ शकतो.

कंपनीमुळे स्थानिकांना रोजगार मिळाला

पुढे निखिल सांगतात की, जेव्हा हा व्यवसाय आम्ही सुरू केला तेव्हा त्याची व्यापकता कमी होती. मजूरवर्गाला त्या काळात भरपूर काम आमच्या कंपनीच्या माध्यमातून मिळालं. आता या व्यवसायाची व्यापकता खूप वाढली आहे. येथील सर्व काम हे मशीनच्या माध्यमातून होते. आमच्याकडे सध्या गावातील 15 लोक नेहमी काम करतात. काही लोकांना होईल तसा रोजगार उपलब्ध होतो. सर्व मशीन इलेक्ट्रिक असल्याने मजूर संख्या कमी करण्यात आली आहे. आधी जी सॅलरी मजुरांना द्यावी लागत होती तीच आता इलेक्ट्रिक बिल म्हणून भरावी लागत आहे. इलेक्ट्रिक मशीनचे बिल महिन्याला 6 ते 7 लाख रुपये भरावे लागते.

internal-image-4-1.jpg

क्रेटचे वेगवेगळे प्रकार

‘पीपी’ म्हणजेच एकवेळ वापरासाठी, “सीपी’ म्हणजेच दोन ते तीन वेळा वापर व ‘एचडी' दीर्घकाळ वापरासाठी अशा तीन ग्रेडसमध्ये हे क्रेट तयार केले जातात. ‘पीपी’ ची प्रॉडक्शन कॉस्ट 80 रुपये येते आणि त्यावर कंपनीला 8 ते 10 % मार्जिन मिळते. क्रेटनुसार त्यांचे 100 रुपयांपासून ते 250  रुपयांपर्यंत दर आहेत. त्यासाठी लागणारा कच्चा माल 50 ते 80  रुपये प्रति किलो दराप्रमाणे गुजरात, जळगाव, दमण, नागपूर येथून आणावा लागतो. 

कंपनीची वार्षिक उलाढाल

'महामनी'शी बोलतांना निखिल पुढे सांगतात की,  2017 मध्ये जेव्हा आम्ही कंपनी स्थापन केली तेव्हा अगदी थोड्या प्रमाणात उलाढाल होती. कमी प्रमाणावर आमचा व्यवसाय सुरू होता. नंतर हळूहळू त्यात गती आली. संत्राची आवक आणि निर्यात जसजशी वाधात गेली तसतसा आमचा व्यवसाय सुद्धा वाढत गेला. गेल्या 6 वर्षात आम्ही 35 ते 40 लाख क्रेटची निर्मिती केली. क्रेटची विक्री थेट व्यापारी व शेतकऱ्यांना आम्ही करतो. माऊली प्लॅस्टिक प्रायवेट लिमिटेडची सध्याची वार्षिक उलाढाल की 6 ते 7 कोटी रुपयांची आहे. 

internal-image-6.jpg
एचडी क्रेट 

संत्रासह इतरही फळबागांचा व्यवसायाला आधार

राजस्थान, परतवाडा, अमरावती, वरूड, मोर्शी, मध्य प्रदेशातील पांढुर्णा, सौंसर, काटोल, सावनेर, नरखेड या भागातून व्यापारी क्रेट खरेदीसाठी शेंदूरजणाघाट येथे येतात. फक्त संत्राच नव्हे, तर आंबा, द्राक्षे या पिकांसाठीही आपल्या क्रेटची विक्री होत असते. वाढत्या मागणीनुसार, वर्षभरात तीन लाखांहून अधिक क्रेटचे उत्पादन केले जात आहे. शेतीतील उत्पन्नातून फक्त घर खर्चच नाही तर इतर उद्योग केले, तर त्यातून खूप मोठे साम्राज्य उभे करता येऊ शकते, याचेच एक उदाहरण उद्धवराव फुटाणे आहेत.