Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Aam Admi Bima Yojana: कुटुंबातील प्रत्येक सदस्याला इन्शुरन्सच्या छत्राखाली आणणारी योजना

LIC Aam Admi Bima Yojana

LIC Aam Admi Bima Yojana: ग्रामीण भूमिहीन कुटुंबे डोळ्यासमोर ठेऊन सरकार या योजने अंतर्गत दारिद्र्य-रेषेखालील नागरिकांचा इन्शुरन्स काढते. यामुळे लाभार्थी व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य मिळते.

LIC Aam Admi Bima Yojana: रोजच्या जगण्याचा संघर्ष असणारी व्यक्ती तिच्या मृत्यूनंतर कुटुंबियांच्या जीवनशैलीचा विचार कुठून करणार !!! “दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणारा” पिता मुलांच्या शिक्षणाचा भार कसा काय उचलणार !!! भारताच्या लोकसंख्येचा प्रचंड मोठा भाग हा गरीब, दारिद्र्य-रेषेखाली “जीवन” (?) व्यतीत करतोय. “मरणाने केली सुटका, इतके जीवनाने छळले होते” अशी अवस्था असलेल्या व्यक्तींचाही सन्मानाने जगण्याचा, त्याच्यापश्चात त्याच्याही कुटुंबाला सावरण्याची संधी देण्याचा आणि त्याच्याही शाळकरी मुलांचा वह्या-पुस्तके-गणवेशाचा, अधिकार मान्य करणारी योजना म्हणजे “LIC ची आम आदमी विमा योजना”. 2 ऑक्टोबर 2007 रोजी सुरु करण्यात आलेल्या या सामाजिक सुरक्षा योजनेचे वर्तमान वर्ष “2023” चालू आहे.

“ग्रामीण भूमिहीन कुटुंबे” डोळ्यासमोर ठेऊनच, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन पुरस्कृत या योजनेअंतर्गत राज्यातील BPL अर्थात दारिद्र्य-रेषेखालील जनतेचा विमा उतरवला जातो, ज्यामुळे लाभार्थी व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व किंवा आंशिक अपंगत्त्व आल्यास त्याला किंवा त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य मिळेल. ग्रामीण तसेच शहरी भागातील 18 ते 59 वयोगटातील भूमिहीन कुटुंबातील रोजगार करणारा कुटुंब प्रमुखाचा किंवा त्या कुटुंबातील एक प्रमुख कमावती व्यक्तीचा LIC अर्थात  भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून विमा उतरवला जातो आणि लाभार्थ्यांच्या शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते.


आम आदमी विमा योजनेसाठी 200/- रुपये वार्षिक प्रीमियम आकारला जातो.  त्यापैकी 100/-  रुपये शासनामार्फत (50 टक्के केंद्र सरकार आणि 50 टक्के राज्य शासन) दिले जातात आणि उर्वरित 100/- रुपये लाभार्थ्यास भरावे लागतात. विम्याचे संरक्षण असलेल्या कालावधीमध्ये लाभार्थ्यांचा नैसर्गिक कारणामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला 30,000/- रुपये, तर अपघाती-मृत्यू प्रकरणी 75,000/- रुपये दिले जातात. लाभार्थ्याला आंशिक अपंगत्व आल्यास 37,500/- रुपये आणि दुर्दैवाने कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व आल्यास 75,000/- रुपयांची मदत दिली जाते. लाभार्थ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्वाचे दावे LIC च्या पेन्शन & ग्रुप स्कीम युनिटतर्फे NEFT द्वारे किंवा  NEFT नसल्यास DBT (direct benefit transfer) द्वारे बँक-खात्यात जमा करून निकाली काढण्यात येतात.

लाभार्थ्यांच्या शिक्षण घेत असलेल्या मुलांना इयत्ता ९वी ते १२वी दरम्यान प्रतिमहिना 100/- रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. LIC तर्फे ही शिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक वर्षाच्या प्रत्येक सहामाहीत, 1 जुलै आणि 1 जानेवारीसाठी, NEFT द्वारे लाभार्थी विद्यार्थ्याच्या खात्यात जमा केली जाते.

आम आदमी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. आम आदमी विमा योजना अर्ज, दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड, ओळखीचा पुरावा, आधार / पॅन कार्ड, जन्माचा दाखला किंवा शाळेचा दाखला, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचे फोटो, वारसाचे कागदपत्र इत्यादी अशा अगदी बेसिक डॉक्युमेंट्सच्या सहाय्याने या योजनेसाठी व्यक्ती “पात्र लाभार्थी” होऊ शकते. सोबत त्याचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक असते.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी “Licindia.in” व्हिजिट करणे आवश्यक आहे. होम-पेज वर “Aam Aadmi Bima Yojana Apply Online” वर दिलेल्या सूचना फॉलो केल्यास अर्ज प्राप्त होतो. त्याची प्रिंट-आउट घेऊन योग्य त्या डॉक्युमेंट्ससोबत नजीकच्या नोडल सेंटर किंवा एजन्सी कार्यालयामध्ये सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 022-6827 6827 वर क्रमांकावर संपर्क साधणे, सोयीस्कर असेल.

सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना आजूबाजूला असे कष्टकरी, भूमिहीन कामगार, मजूर, श्रमिक किंवा त्यांची शिक्षण घेत असलेली मुले दिसत असतात. सर्वानाच अशा योजनांची माहिती देखील नसते. तेव्हा आपण अशा योजनेची माहिती त्यांच्यापर्यत पोहोचवू शकतो.