आपल्या देशात ‘परक्या घरचं धन’ म्हणून मुलींकडे बघितले जाते. लग्नानंतर सासरी गेलेल्या मुलीचा माहेरच्या कुठल्याच गोष्टींवर अधिकार उरत नाही अशी सर्वसामान्य मान्यता आहे. परंतु याच मान्यतेविरोधात कर्नाटक हायकोर्टाने एक महत्वाचा निकाल दिलाय. हायकोर्टाने अशाप्रकाच्या दुटप्पी वागणुकीला वाईट ठरवले आहे.
एका खटल्याची सुनावणी करताना कर्नाटक हायकोर्टाने महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. लग्नानंतर घरातील मुलांचा दर्जा जर बदलत नसेल तर मग सासरी गेलेल्या विवाहित मुलींचा दर्जा बदलण्याची गरज काय? तसेच लग्नानंतर मुलगी परकी होते का? असा सवाल देखील न्यायालयाने विचारले आहेत. कर्नाटकातील सैनिक वेलफेयर बोर्डच्या नियमावली नुसार विवाहित मुलींना त्यांच्या वडिलांना देऊ केलेल्या सुविधांमध्ये कसलाही अधिकार असणार नाही असे म्हटले होते. याविरोधात एक याचिका कर्नाटक हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
न्यायमूर्ती ए.म नागप्रसन्ना यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात हा निर्णय दिला. शहीद सुभेदार रमेश खंडप्पा पाटील यांच्या 31 वर्षीय मुलीने,प्रियांका पाटीलने एक याचिका दाखल केली होती. सुभेदार रमेश 2001 मध्ये ‘ऑपरेशन पराक्रम’ दरम्यान भूसुरुंगाच्या स्फोटात शहीद झाले होते. प्रियांका पाटील ही वडिलांच्या अपघातावेळी 10 वर्षांची होती.लग्नानंतर प्रियांकाला डिपेंडंट कार्ड नाकारण्यात आले होते. कर्नाटक सरकार माजी सैनिकांच्या कुटुंबांना 10% आरक्षण देते आणि प्रियांकाने त्यासाठीच अर्ज केला होता. लग्नानंतर मुलीला डिपेंडंट कार्ड मिळणार नाही, असा सैनिक वेल्फेअर असोसिएशनचा नियम आहे. सदर नियम लिंगभेद करत असल्याचा आरोप प्रियांकाने केला होता.
मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळा नियम का?
माजी सैनिकांचे मुलगे लग्नाआधी आणि लग्नानंतर देखील डिपेंडंट कार्ड वापरू शकतात असा नियम आहे. परंतु लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलींना मात्र हे कार्ड वापरता येत नाही. या कार्डद्वारे आजी-माजी सैनिकांसाठी असलेले विशेष फायदे त्यांचे कुटुंबीय घेऊ शकतात. यावर टिपण्णी करताना न्यायालयाने म्हटले आहे की, लग्नानंतर मुलगी परकी होत नाही. लिंग आधारित भेदभाव करणे हे कायद्याचे विरोधात आहे तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 चे उल्लंघन आहे.
संपत्तीत महिलांना समान अधिकार
मागच्याच वर्षी सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निकाल दिला होता. त्याद्वारे या महिलांना वडिलांच्या स्वकष्टार्जित व इतर मालमत्तांमध्ये समान वाट्याचा हक्क दिला होता. लग्नानंतर महिलांचा संपत्तीतील वाटा कुणीही हिरावून घेऊ शकत नाही हे वेळोवेळी दिलेल्या निकालांमध्ये न्यायालयाने स्पष्ट केले आहे.