Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Post Payments Bank: घरबसल्या पोस्टाचे डिजिटल सेव्हिंग अकाउंट सुरू करा; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Indian Post Payments Bank Digital Saving Account Open

India Post Payments Bank: तुम्हालाही इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्ये ऑनलाईन डिजिटल सेव्हिंग अकाउंट सुरू करायचे असेल, तर ते तुम्ही घरबसल्या सुरू करू शकता. त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून आयपीपीबी हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. हे अकाउंट ओपन करण्याची प्रक्रिया जाणून घेऊ.

आपल्या सगळ्यांचेच बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट असते. या अकाउंटच्या मदतीने आपण अनेक छोटे-मोठे आर्थिक व्यवहार करू शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का? भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या पोस्टामध्ये देखील सेव्हिंग अकाउंट सुरू करता येते. भारत सरकारने दूरसंचार मंत्रालयाच्या अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची सेवा रांची आणि रायपूर या राज्यातून द्यायला सुरुवात केली. 2018-19 मध्ये ही सेवा देशभरात आयपीपीबी ऑपरेशन्स या नावाने सुरू करण्यात आली. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये तुम्हाला तुमचे सेव्हिंग अकाउंट उघडायचे असेल, तर तुम्हाला बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे तुम्ही घरबसल्या केवळ एका क्लिकवर तुमचे डिजिटल सेव्हिंग अकाउंट सुरू करू शकता. प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर उपलब्ध असणाऱ्या आयपीपीबी या ॲपवरून तुम्ही तुमचे डिजिटल सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकता. त्याची प्रक्रिया जाणून घेऊयात.

डिजिटल सेव्हिंग अकाउंटबद्दल या गोष्टी जाणून घ्या

हे सेव्हिंग अकाउंट 18 वर्षे वय पूर्ण असणारा कोणताही व्यक्ती आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या मदतीने सुरू करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे घरबसल्या अकाउंट सुरू करून 12 महिन्यांच्या कालावधीत केव्हाही केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा यामध्ये देण्यात येते. ही केवायसी प्रक्रिया तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्टाच्या शाखेत जाऊन पूर्ण करता येऊ शकते. या डिजिटल सेव्हिंग अकाउंटचे अनेक फायदे आहेत. महत्त्वाचा फायदा म्हणजे यामध्ये किमान बॅलन्स ठेवण्याची कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. अगदी झिरो बॅलन्स अकाउंट म्हणून सुद्धा आपण या अकाउंटकडे पाहू शकतो.

डिजिटल सेव्हिंग अकाउंट ओपन करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

सर्वप्रथम मोबाईलमध्ये प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरुन आयपीपीबी ॲप डाऊनलोड करा.

ॲप ओपन करून Open Account Now यावर क्लिक करा.

आता मोबाईल नंबर आणि पॅन नंबर टाका. तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. तो टाकून घ्या.

त्यानंतर आधार कार्ड व्हेरिफिकेशन करा. यासाठी मोबाईलवर ओटीपी येईल. त्याद्वारे आधार व्हेरिफाय करा.

बँक खात्याची माहिती भरा. तसेच वैयक्तिक माहिती भरा.

आता नॉमिनीची माहिती भरा. माहिती भरल्यानंतर ती चेक करा.

अशाप्रक्रारे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे डिजिटल सेव्हिंग अकाउंट ओपन होते. हे अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला 12 महिन्यांच्या कालावधीत तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. जर 12 महिन्यांच्या आत केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर तुमचे अकाउंट बंद होते.