Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आशियातील 6 मोठ्या कंपन्यांचे आयपीओ प्रतिक्षेत!

IPO INVESTMENT

IPO Update : येत्या 6 महिन्यात आशियातील सर्वात मोठ्या 6 कंपन्यांचे IPO बाजारात येण्याच्या मार्गावर, भारतातील 'ऑफबिझनेस' या स्टार्टअपचाही यात समावेश आहे.

शेअर बाजारात घसरण झाली असली तरी आशियातील आयपीओ बाजाराची कामगिरी युरोपीय आणि अमेरिकन शेअर बाजारांपेक्षा चांगली राहिली आहे. 2022 च्या उत्तरार्धात आशियाई शेअर बाजारात अनेक मोठे IPO लॉन्च होणार आहेत.

2022 या वर्षातील पहिल्या 6 महिन्यात आशियाई शेअर मार्केटमध्ये (Asian Share Market) आयपीओ (Initial Public Offer)बाबत निरूत्साहाचे वातावरण होते. त्याला कारणही तसेच होते. वाढत्या महागाईची भीती, चलनविषयक धोरणासंदर्भात नवीन कठोर नियम, शेअर मार्केटमधील सततची अस्थिरता यामुळे बऱ्याच कंपन्यांनी आपले आयपीओ मार्केटमध्ये आणण्याचे टाळले होते. पण आता काही प्रमाणात परिस्थिती सुधारू लागली आहे. त्यामुळे आशिया खंडातील काही देशांनी हिरवा सिग्नल देण्यास सुरूवात केली आहे. काही मोठमोठ्या कंपन्यांनी आशियाई बाजारात आयपीओ आणण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आशियाई बाजार IPO ला खुणाऊ लागला आहे.

जागतिक पातळीवर 2022 च्या पहिल्या सहा महिन्यात जवळजवळ सर्वच शेअर मार्केट 70 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या 20 वर्षांत अशी परिस्थिती आली नव्हती, असे शेअर मार्केटमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तरीही, असे असूनही आशियातील आयपीओ बाजाराची कामगिरी युरोपियन आणि अमेरिकन शेअर मार्केटपेक्षा चांगली राहिली. चीन आणि हॉंगकॉँगमधील शेअर मार्केट पुन्हा तेजीत येऊ लागला आहे. जगातील मार्केटच्या तुलनेत या दोन मार्केटमध्ये चांगली रॅली दिसत आहे. यामुळे 2022 मधील उरलेल्या सहा महिन्यात मार्केटची स्थिती चांगली राहील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. मार्केटमधील या चांगल्या वातावरणामुळे आशियाई मार्केटमध्ये आयपीओ लॉण्च करण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या आतुर आहेत. यातील काही कंपन्यांची माहिती आपण घेऊ.

1. सायजेंटा समूह (Syngenta Group)

सायजेंटा ही चायना नॅशनल केमिकल कॉर्पोरेशनच्या मालकीची बियाणे आणि खत निर्मिती क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. ही कंपनी यावर्षी शांघाय स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंग होण्यासाठी प्रयत्नशील आहे. Syngenta group हा 65 अब्ज युआनचा (भारतीय चलनात 768.69 कोटी) आयपीओ आणू शकतो. जो या वर्षातील सर्वांत मोठा IPO ठरू शकतो.

2. ऑफबिझनेस (OfBusines)

ऑफबिझनेस हे एक इंडियन स्टार्टअप आहे. याची सुरूवात एका जोडप्याने केली होती. कंपनी आपला आयपीओ आणून 2 अब्ज डॉलर (भारतीय चलनात 158.51 कोटी रूपये) उभारण्याचा विचार करत आहे. या स्टार्टमधील एक सहसंस्थापकाने एप्रिलमध्ये म्हटले होते की, 2022 च्या अखेरपर्यंत आयपीओ आणण्याचा विचार कंपनी करत आहे. ऑफबिझनेस ही कंपनी भारतातील उद्योगांना बल्कमध्ये रॉ मटेरियल खरेदी करण्यासाठी मदत करते.

3. बीयरको (BeerCo)

ही थायलंडमधील एक वेबरेज कंपनी आहे; ज्यांनी यापूर्वी दोनदा आपला आयपीओ आणण्याचा प्रयत्न केला होता. कंपनी आता तिसऱ्यांदा प्रयत्न करत आहे. यावेळी कंपनीला आयपीओ आणण्यास यश मिळेल, असे कंपनीच्या संचालकांना वाटत आहे. बीयरको आपल्या आयपीओद्वारे 80 कोटी ते 1 अब्ज डॉलर उभारण्याचा विचार करू शकते. यापूर्वी कंपनीला कोरोनामुळे दोनदा आपला आयपीओ आणण्याचे नियोजन रद्द करावे लागले होते. 

4. के बॅंक (K Bank)

के बॅंक ही दक्षिण कोरियामधील (South Korea) ऑनलाईन बॅंक आहे. के बॅंकेला आयपीओ आणण्याची परवानगी मिळाली असून, आयपीओमधून कंपनी सुमारे 1 अब्ज डॉलर उभारण्याचा विचार करत आहे. वर्षाच्या अखेरीस पर्यंत के बॅंक आपला आयपीओ आणण्याची शक्यता आहे.

5. राकुटेन बॅंक (Rakutain Bank)

जपानच्या ऑनलाईन रिटेलर राकुटेन समुहाने या आठवड्यात टोकिओच्या स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग करण्यासाठी अर्ज केला आहे. राकुटेन आयपीओच्या माध्यमातून सुमारे 1 अब्ज डॉलरचा निधी उभा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. जपानमध्ये गेल्या 3 वर्षात 1 अब्ज डॉलर किंवा त्यापेक्षा जास्तीचा आयपीओ आलेला नाही.

6. एंट ग्रुप (Ant Group)

चीनमधील एंट ग्रुपसुद्धा या वर्षा अखेरपर्यंत मेगा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. एंट ग्रुपने 2 वर्षांपूर्वी आयपीओ आणण्याचा प्रयत्न केला होता. पण चीनच्या सरकारकडून दबाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर एंट ग्रुपने आयपीओ ऐनवेळी रद्द केला होता. एंट ग्रुपचा आयपीओ हा जगभरातील सर्वांत मोठा आयपीओ असू शकतो, असे शेअर मार्केटमधील तज्ज्ञांचे मत आहे.