What Rich Buy :अती श्रीमंत व्यक्ती काय खरेदी करतात याची उत्सुकता सर्वसामान्य नागरिकांना कायमच राहिली आहे. घर, आलिशान गाड्या, घड्याळे यासह अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यावर श्रीमंत व्यक्ती पाण्यासारखा पैसा खर्च करतात. भारतातील अल्ट्रा हाय नेटवर्थ असलेल्या व्यक्ती काय खरेदी करतात याची माहिती नुकतीच समोर आली आहे. पाहूया कोणत्या गोष्टींसाठी श्रीमंत व्यक्ती पैसे खर्च करतात.
नाइट फ्रँक इंडिया या कंपनीने 'The Wealth Report 2023' तयार केला असून त्यातून ही माहिती समोर आली आहे. या अहवालात कंपनीने Knight Frank Luxury Investment Index (KFLII) जारी केला आहे. 2022 मध्ये श्रीमंत व्यक्तींनी कोणत्या दहा वस्तू सर्वाधिक खरेदी केल्या त्या पाहू. यास 'पॅशन इनव्हेस्टमेंट' असंही म्हटलंय. तसेच 2023 मध्ये श्रीमंत व्यक्ती कोणत्या वस्तू खरेदी करतील, याचीही माहिती अहवालात देण्यात आली आहे.
या यादीत सर्वात प्रथम क्रमांकावर आर्ट(कला) असून श्रीमंत व्यक्ती कलेशी संबंधित वस्तू खर्च करण्यासाठी सर्वाधिक पैसे खर्च करतात. या वस्तू खरेदी करुन परत विक्री केल्यानंतर 2022 मध्ये 29% पर्यंत परतावा मिळवला.
दुसऱ्या क्रमांकावर जुन्या गाड्या खरेदी करण्यावर श्रीमंत व्यक्ती पैसे खर्च करतात. जुन्या गाड्यांची खरेदी करण्याची क्रेझ श्रीमंत व्यक्तींमध्ये जास्त आहे. दरवर्षी जुन्या गाड्यांच्या किंमती 25% नी वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे अशा दुर्मिळ गाड्या खरेदी करण्यावर अतीश्रीमंत व्यक्ती खर्च करतात. मर्सिडिझ बेन्झ कंपनीची Uhlenhaut Coupe ही गाडी मागील वर्षी 143 मिलियन डॉलरला विकली गेली. 2022 मधील सर्वाधिक महाग कार ठरली.
घड्याळे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महागड्या घड्याळ्यांच्या किंमती दरवर्षी 18% दराने वाढतात. त्यानंतर हँडबॅग्ज, वाइन्स, ज्वेलरीवर श्रीमंत व्यक्ती सर्वाधिक पैसे खर्च करतात. दुर्मिळ व्हिस्की मद्य खरेदी करण्यासाठीही श्रीमंत व्यक्ती पैसे खर्च करतात. दुर्मिळ व्हिस्कीवर श्रीमंत व्यक्ती सर्वाधिक म्हणजे 373 % परतावा मिळवतात. 81 वर्ष जुनी Macallan The Reach हे सिंगल माल्ट मद्य 3,00,000 अमेरिकी डॉलरला विकले गेले.