अनेकांना मुलांच्या भविष्याची चिंता सतावत असते. विशेषकरून मुलांचे शिक्षण. सध्याची शिक्षणाची स्थिती पाहिली तर उच्च शिक्षण खूपच महागडे झाले आहे. भारतात राहून मुलांना डॉक्टर किंवा इंजिनिअर करण्यासाठी सुद्धा लाखो रुपये लागतात. अशावेळी तुम्ही मुलांच्या पहिल्या वाढदिवसापासून गुंतवणूक करू शकता. या गुंतवणुकीतून तुम्ही नक्कीच 20 वर्षांनी मोठा फंड उभा करू शकता.
मुलांच्या शिक्षणासाठी निधी जमा करताना, गुंतवलेल्या निधीमध्ये ठराविक वर्षांनी वाढ झाली पाहिजे. यासाठी म्युच्युअल फंडमधील एसआयपीद्वारे प्रत्येक महिन्याला पालकांनी 5 हजारांची गुंतवणूक केली तर मुलाच्या 20व्या वर्षापर्यंत या गुंतवणुकीतून 50 लाखांपर्यंतचा निधी जमा होऊ शकतो.
एसआयपीद्वारे गुंतवणूक करा
म्युच्युअल फंडमधील सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅनमधून गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले आहे. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवलेल्या रकमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळत असल्याने दीर्घकालीन गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. विविध म्युच्युअल फंडच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, अनेक फंड गुंतवणूकदारांना 12 टक्क्यांपर्यंत परतावा देत आहेत. पण म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही जोखीमयुक्त गुंतवणूक मानली जाते. यामधून एवढा परतावा मिळेलच. याची कोणीही हमी देत नाही. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी अधिकृत आर्थिक गुंतवणूक सल्लागाराची मदत घेऊनच त्यात गुंतवणूक करावी.
Mutual Fund Investment
20 वर्षांत 50 लाख रुपये कसे जमणार?
जर तुम्ही मुलाच्या पहिल्या वाढदिवसापासून प्रत्येक महिन्याला 5 हजारांची एसआयपी सुरू केली. ही एसआयपी तुम्ही सतत 20 वर्षे सुरू ठेवली. तर तुमची 20 वर्षातील एकूण गुंतवणूक 12 लाख रुपये होईल. या एकूण रकमेवर किमान 12 टक्के रिटर्नने 37,95,740 रुपयांचे व्याज मिळेल. त्यात तुमची मुद्दल 12 लाख रुपये अॅड केले की तुमचा 50 लाखांचा निधी तयार. अशाप्रकारे प्रत्येक महिन्याच्या 5 हजारांच्या गुंतवणुकीतून 20 वर्षात 50 लाखांचा निधी उभार करता येऊ शकतो.
तुम्ही जर मुलाच्या 18 वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला 5 हजारांची गुंतवणूक सुरू ठेवल्यास 18 वर्षांनी तुम्हाला त्या रकमेवर 12 टक्क्यांनुसार 35,58,643 रुपये मिळतील आणि तुमची 18 वर्षातील एकूण गुंतवणूक असेल 10,80,000 रुपये म्हणजेच वयाच्या 18 वर्षापर्यंत तुमच्याकडे या गुंतवणुकीतून 45 लाख रुपयांचा फंड जमा होऊ शकतो.
(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)