क्रिप्टोकरन्सीचा समावेश असलेले घोटाळे आता केवळ ऑनलाईन प्लॅटफॉर्मपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. तर चक्क लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून सर्रास लुटले जात आहे. दिल्लीमध्ये नव्याने आलेल्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने सुमारे 500 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा दिल्ली पोलिस समाचार घेत आहे.
टाईम्स ऑफ इंडिया (Times Of India) या वृत्तपत्राने दिलेल्या रिपोर्टनुसार, दिल्ली पोलिसांनी 500 कोटी रुपयांचा क्रिप्टो (Crypto) घोटाळा उघडकीस आणला आहे. या घोटाळ्यात एका ग्रुपने गुंतवणूकदारांना फिरण्यासाठी गोव्यात नेले. तेथे भव्य-दिव्य असा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी उपस्थितांना घोटाळेबाजांनी ब्लॉकचेन तंत्रज्ञान (Blockchain Technology) आणि नवीन क्रिप्टोकरन्सी बाजारात आल्याचे सांगितले होते. तसेच यात गुंतवणूक करणाऱ्यांना 200 टक्के रिटर्न्ससोबत पुढल्या सुट्टीत दुबईमध्ये नेण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला भुलून अनेकांना पैसे भरल्याचे समोर आले आहे. एका व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याची सुमारे 1.47 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.
गुंतवणूकदारांकडून पैसे घेताना घोटाळेबाजांनी दुबईत कंपनीचे कॉर्पोरेट ऑफिस असल्याचे हुलकावणी दिली होती. त्यावर काही गुंतवणूकदारांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता तिथे त्यांना बांधकाम सुरू असलेल्या इमारती दाखवण्यात आल्या. या अशा भुलथापांना भुलून आणि 200 टक्के रिटर्न्स मिळण्याच्या आशेने अनेकांनी लाखो रुपये जमा केले. पण काही गुंतवणूकदारांना संशय आल्याने त्यांनी गुंतवणुकीची तपासणी करण्यासाठी आणि ऑनलाईन पैसे काढण्यासाठी संशयितांनी दाखवलेल्या वेबसाईटवरून पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण तिथे फक्त एरर मॅसेज व्यतिरिक्त काहीही येत नव्हते, अशाप्रकारे काही गुंतवणूकदारांनी तक्रारीत माहिती दिली.
1.47 कोटी रुपयांची फसवणूक झालेल्या एका व्यक्तीने सांगितले की, या नवीन क्रिप्टोकरन्सीचा सध्याचा भाव 2.5 डॉलर्स इतका आहे. भविष्यात हे दर आणखी वाढतील. तसेच प्रत्येक महिन्याच्या 5, 10, 15 किंवा 25 तारखेला खात्यात नफा जमा होत राहील, असे त्यांना सागितले गेले होते.
झटपट पैसे मिळवण्याच्या आमिषामुळे गुंतवणूकदार स्वत:चे आतोनात नुकसान करून घेत आहेत. अशा स्कीममध्ये फसणारे बरेच गुंतवणूकदार हे त्यांच्या राहणीमानात काटकसर करून किंवा कर्ज घेऊन अशा स्कीममध्ये पैसे टाकत आहेत. अशा लोकांच्या भावनांचा खेळ केला आहे. त्यामुळे अशा झटपट पैसे मिळवून देणाऱ्या स्कीमपासून दूर राहिले पाहिजे.