अॅपल कंपनीला मुंबई आणि दिल्ली इथं आपले दोन खास स्टोअर्स लॉन्च केल्यानं प्रचंड फायदा झालाय. कमाईच्या बाबतीत कंपनीनं एक पाऊल पुढे टाकलंय. ऑनलाइन विक्रीसह आता ऑफलाइनही जोमात सुरू झालंय. एका वृत्तानुसार, मुंबई आणि दिल्लीतली स्टोअर्स विक्रीच्या बाबतीत एका महिन्यात 22 ते 25 कोटी रुपयांची कमाई करताना दिसत आहेत. याचा अर्थ अॅपलला दर महिन्याला एकूण 44 ते 50 कोटींची कमाई होतेय. ही रक्कम कितीतरी पट अधिक आहे.
Table of contents [Show]
इतर इलेक्ट्रॉनिक्स दुकानांच्या उत्पन्नापेक्षा दुप्पट
देशातल्या इतर इलेक्ट्रॉनिक्स दुकानांच्या उत्पन्नापेक्षा खरं तर दुप्पट म्हणालयला हवी. अॅपलची उत्पादनं ही महाग आहेत. भारतासारख्या देशात ती अत्यंत मर्यादित स्वरुपात विकली जातात. प्रिमियम प्रकारातली ही सर्व उपकरणं आहेत. अशात कंपनीनं घेतलेलं उत्पन्न पाहता अॅपल कंपनीचं डिव्हाइस आपल्याकडेही असावं, असं अनेकांना वाटू लागलंय. कितीही महाग असलं तरी ते खरेदी करण्याकडे सर्वांचा कल दिसून येतोय.
सरासरी विक्री किंमत जास्त
यासंदर्भात कंपनीच्या एक्झिक्युटिव्हनं माहिती दिलीय. भारतातल्या कंपनीच्या मालकीचे दोन अॅपल स्टोअर्स प्रति स्क्वेअर फूट नवनवीन कमाईचे विक्रम प्रस्थापित करत आहेत. अॅपलच्या उत्पादनांची सरासरी विक्री किंमत (ASP) खूप जास्त आहे. सहाजिकच त्यामुळे जास्त महसूल मिळत आहे. मुंबई आणि दिल्ली अशा दोन्ही अॅपल स्टोअर्समध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळतेय, असं सांगण्यात आलंय.
उद्घाटनाच्या एका दिवसात 10 कोटींची विक्री
अॅपलनं या वर्षी एप्रिल महिन्यात मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अॅपलचं स्टोअर ओपन केलं. खुद्द कंपनीचे सीईओ टिम कुक हेदेखील यासाठी भारतात आले होते. त्यांनी मुंबईतल्या स्टोअरचं उद्घाटन केलं. त्यानंतर दिल्लीतल्या साकेत याठिकाणी सिलेक्ट सिटी मॉलचं अॅपल स्टोअरही ओपन केलं. मुंबईतलं स्टोअर सुरू झालं, त्या दिवसापासूनच कमाईला सुरुवात झाली. विशेष म्हणजे उद्घाटनाच्या एका दिवसात या स्टोअरनं 10 कोटींची विक्री केली.
उच्चशिक्षित कर्मचारी आणि सेवा
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अॅपल सर्वच बाजूंनी प्रयत्न करत असल्याचं दिसतं. मुंबई-दिल्ली या दोन्ही ठिकाणी असलेल्या अॅपल स्टोअरमधले कर्मचारी उच्चशिक्षित आहेत. मुंबईतल्या स्टोअरमध्ये 25 भाषा जाणणारे तर दिल्लीतल्या स्टोअरमध्ये 15 भाषा जाणणारे कर्मचारी आहेत. उत्पादनं तर आकर्षक आहेतच मात्र त्यासोबत ग्राहकांना इतरही सुविधा हव्या असतात. त्यातही अॅपलनं आघाडी घेतलीय. या बाबींचाही उत्पन्नावर परिणाम होतो. त्यामुळे आता जरी 50 कोटींचा आकडा गाठला असला तरी भविष्यात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.