Health Insurance: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आरोग्य विमा पॉलिसीमध्ये विमा कंपनीकडून अनेक बेनिफिट्स दिले जातात. मात्र, यातील बरेचशे ग्राहकांच्या फायद्याचे नसतात. फक्त बेनिफिट्सची संख्या फुगवून सांगितली जाते. त्यामुळे पॉलिसीची विक्री वाढते. मात्र, विमा पॉलिसीमध्ये अशा काही गोष्टी असतात, ज्या तुम्ही सर्वप्रथम पाहिल्या पाहिजेत. जर या गोष्टींमधून मिळणारे फायदे चांगले असतील तरच पॉलिसी घ्यावी.
पॉलिसीची कागदपत्रे किचकट असतात. (Things to Check in Health Insurance Doc) त्यामुळे जेव्हा तुम्ही विमा प्रतिनिधीशी बोलता तेव्हाच महत्त्वाच्या गोष्टी विचारून घ्याव्यात. तसेच जेव्हा पॉलिसी घेता त्यावेळी पाठवलेली कागदपत्रे पाहूनच सह्या करा. अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल.
वेटिंग पिरियड (Waiting period in Insurance)
विमा पॉलिसीमध्ये तीन प्रकारचे वेटिंग पिरियड असतात. यापैकी पहिला स्टँडर्ड वेटिंग पिरियड. हा कालावधी सहसा 30 दिवसांचा असतो. काही कंपन्यांचा हा कालावधी 1 महिन्यापेक्षा जास्त असू शकतो. पॉलिसी घेतल्यानंतर पहिल्या 30 दिवसांमध्ये विम्याचा फायदा घेता येत नाही. फक्त अपघात झाल्यास फायदा मिळू शकतो. ज्या कंपनीचा हा वेटिंग पिरियड कमीत कमी आहे त्या कंपनीची पॉलिसी निवडावी.
दुसऱ्या प्रकारचा वेटिंग पिरियड म्हणजे पूर्वीपासूनचे असलेल्या आजारांसाठी वेटिंग पिरियड. हा कालावधी तीन ते चार वर्षांचा असू शकतो. तर काही पॉलिसीमध्ये दोन किंवा एक वर्षाचाही असतो. म्हणजेच जर तुम्हाला आधीपासून एखादा आजार असेल आणि त्यावरील उपचारासाठी रुग्णालयात भरती झाला तर विम्याचा लाभ मिळणार नाही. वेटिंग पिरियड संपल्यानंतरच विम्याचा फायदा घेता येईल.
तिसऱ्या प्रकार म्हणजे काही विशिष्ट प्रकारच्या आजारांसाठी वेटिंग पिरियड असतो. यामध्ये वेगळ्या आजारांची लिस्ट असते. यासाठीही वेटिंग पिरियड असतो. जी विमा कंपनी हे तिन्ही प्रकारचे वेटिंग पिरियड कमीत कमी देईल त्या पॉलिसीची निवड करावी.
रुम भाडे अट (Room rent Cap in Health Insurance)
विमा पॉलिसीमध्ये बऱ्याच वेळा रुम रेंटवर मर्यादा घालण्यात आलेली असते. जर रुम भाडे 5 हजार रुपयांपर्यंतच मंजूर असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त भाडे असलेली रुम घेतल्यास तुम्हाला अधिकचे भाडे खिशातून द्यावे लागेल. ज्या विमा पॉलिसीत रुम रेंटवर कोणतीही मर्यादा नाही, सहसा अशी पॉलिसी निवडावी. कारण, प्राइव्हेट एसी, सिंगल एसी रूम रुग्णासाठी जास्त आरामदायी असते. अशी रुम निवडण्याचे स्वातंत्र्य हवे. त्यासाठी रुम भाड्याची अट नसावी.
प्री आणि पोस्ट हॉस्टिटलायझेशन पिरियड (Pre and Post Hospitalization cover)
जेव्हा तुम्ही रुग्णालयात भरती होता तेव्हा विम्याची गरज तर लागतेच. मात्र, रुग्णालयात भरती होण्यापूर्वी आणि रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही विमा मदतीला येतो. अनेक पॉलिसी रुग्णालयात भरती होण्यापूर्वीची एक-दोन महिने आणि रुग्णालयातून घरी आल्यानंतर सहा महिन्यांपर्यंतचे खर्च कव्हर करतात. यामध्ये रुग्णाची काळजी घेण्यासाठीचा खर्च, वैद्यकीय मदत, गोळ्या औषधे, होम ट्रिटमेंट कव्हर केलेली असते. जी कंपनी जास्तीत जास्त कालावधीपर्यंत होम केअर देते त्या पॉलिसीची निवड करावी.
रिस्टोरेशन बेनिफिट (Health Insurance Restoration benefit)
समजा तुम्ही 3 लाख रुपयांची फॅमिली फ्लोटर विमा पॉलिसी घेतली आहे. मात्र, सहा महिन्यांतच कुटुंबातील एखादा सदस्य आजारी पडला आणि तीन लाख रुपये रुग्णालयाचे बील झाले. हा खर्च तर विमा कंपनी कव्हर करेल. मात्र, त्यानंतर जर कुटुंबातील कोणी आजारी पडले तर विम्याची रक्कम संपुष्टात आल्याने फायदा घेता येणार नाही.
अनेक विमा कंपन्या रिस्टोरेशन बेनिफिट देतात. म्हणजेच पॉलिसीची रक्कम पूर्ण संपल्यानंतर पुन्हा तेवढ्याच रकमेचा विमा देतात. काही पॉलिसी असे बेनिफिट पॉलिसी कालावधीच अनलिमिटेड वेळा देतात, अशा पॉलिसींची निवड करावी. रिस्टोरेशन बेनिफिट कमी अथवा न देणाऱ्या पॉलिसी टाळाव्यात.
आरोग्य तपासणी (Complimentary Health Check-up)
जेव्हा तुम्ही पॉलिसी विकत घेता तेव्हा काही विमा कंपन्या अतिरिक्त बेनिफिट म्हणून हेल्थ चेकअपची फॅसिलिटी देतात. बाराशे रुपये ते सात हजार रुपयांपर्यंतच्या टेस्ट तुम्ही यातून करू शकता. त्यामुळे वेगळा खर्च करण्याची गरज नाही. जी विमा कंपनी जास्तीत जास्त पैसे आरोग्य तपासणीसाठी बेनिफिट म्हणून देईल त्या विमा कंपनीची निवड करावी.