रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात 20 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे इरशाळगडावर भूसख्लन (landslide) झाले. यामुळे येथील इरशाळवाडीतील काही घरे गाढली गेली. या नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली. त्यानंतर शासन स्तरावर आणि अनेक सामाजिक संस्थाकडून इरशाळवाडीतील बाधितांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला. त्याचप्रमाणे शासनाच्या आदिवासी विकास मंत्रालयाकडून एकूण 41 लाखांचा मदत निधी येथील बाधित कुटुंबांना देण्यात येणार आहे. याबाबत आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांनी माहिती दिली आहे.
27 जणांचा मृत्यू
20 जुलैच्या मध्यरात्री इर्शाळगडावर भूसख्लन झाले आणि यामध्ये इरशाळवाडीतील घरे गाढली गेली. या घटनेत एकूण 27 जणांचा मृत्यू झाला. तर शोध मोहीम थांबेपर्यंत 57 जण बेपत्ता असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच या नैसर्गिक आपत्तीनंतर एकूण 43 कुटुंबातील तब्बल 144 लोक बचावले आहेत. त्यांचे संसार पुन्हा उभे करून देण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतपरी मदत करण्यात येत आहे. तसेच या घटनेत 22 मुलं निराधार झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत इरशाळवाडीच्या नैसर्गिक आपत्तीबाधित आदिवासी कुटुंबांना 41 लाखांची मदत जाहीर करण्यात आली.
मदत निधी दुप्पट-
आदिवासी विभागाकडून देण्यात येणारी आर्थिक मदत ही प्रत्येक कुटुंबास 1 लाख या प्रमाणे देण्यात येणार आहे. हा आर्थिक निधी आपत्ती बाधित कुटुंबांना दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरविण्यासाठी दिला जात आहे. यापूर्वी हा निधी 50 हजार देण्यात येत होता. मात्र विशेष बाब म्हणून हा मदत निधी 1 लाख रुपये करण्यात आला असून तो निधी पेण येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्या आला आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी याबाबतची माहिती दिली.
मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत-
दरम्यान, या दु्र्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसांना शासनाकडून 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच या दुर्घटना काळात येथील पीडित कुटंबांना तात्पूरता निवाराशेड, रेशन आणि शिवभोजनचाही पुरवठा करण्यात आला होता.