Nagpur Division of ST Corporation: आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविकांना विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाची ओढ लागते. यासाठी महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या सर्वच विभागातून पंढरपूरला विशेष गाड्या सोडण्याची व्यवस्था केली जाते. याचअंतर्गत नागपूर विभागाने देखील 22 ते 29 जून दरम्यान नागपूर ते पंढरपूर विशेष बसेस सोडल्या होत्या. या आठ दिवसांमध्ये एकूण 60 स्पेशल बसेस सोडण्यात आल्याने, त्या माध्यमातून एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला 34,25,440 रुपयांचे उत्पन्न झाले. यादरम्यान 8 हजार 706 भाविकांनी स्पेशल गाड्यांनी वारी केली.
6 आगारातून सोडल्या गाड्या
29 जून रोजी आषाढी एकादशी होती. त्यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने थेट 22 जून पासून गाड्या सोडणे सुरु केले. याअंतर्गत सावनेर, काटोल, घाटरोड, गणेशपेठ, इमामवाडा आणि वर्धमाननगर या आगारतून दररोज गाड्या सोडल्या जात असे. प्रत्येक दिवशी प्रत्येक आगारातून पंढरपूरला गाड्या सोडण्याची संख्या वेगवेगळी होती.
तुलनेत यंदा उत्पन्न जास्त
एका लालपरी मध्ये एका वेळी 43 प्रवाशी नेण्याची क्षमता असल्याने, 60 बसेसच्या माध्यमातून 8 हजार 706 भाविकांनी पंढरपुरची वारी केली. तर या वारीकरीता उत्तम सुधारणा आणि सोई असलेल्या लालपरी देण्यात आल्या होत्या. त्यातही पंढरपूरला जाणाऱ्या तिकीट दरामध्ये महिलांना 50 टक्के आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत देण्यात आली होती. तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजने अंतर्गत 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पंढरपूर तिकीट दरामध्ये संपूर्ण 100 टक्के सवलत देण्यात आली होती. गेल्या वर्षी पंढरपूर वारीमधून एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला 23 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न झाले होते. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षीचे उत्पन्न जास्त होते.