Income Tax Notice to YouTuber: उत्तर प्रदेशमधील एका 33 वर्षांच्या यूट्यूबरला इन्कम टॅक्स विभागाने नोटीस पाठवली आहे. ही नोटीस जवळपास 2.6 कोटी रुपयांच्या व्यवहारासंबंधी असल्याचे समजते. पण सदर युवकाला यूट्यूब चॅनेलमधून इतके पैसे मिळत नाहीत. तरीही त्याला इतक्या मोठ्या रकमेसंदर्भात नोटीस आल्याने त्याचे धाबे दणाणले आहेत.
यूट्यूब चालवणाऱ्या या युवकाचे नाव महाराणा प्रताप सिंह आहे. त्याला यापूर्वीही इन्कम टॅक्स विभागाने आतापर्यंत 5 नोटीसी पाठवल्या आहेत. या सहाव्या नोटीसमध्ये 2.6 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा उल्लेख झाल्यामुळे महाराणा प्रताप सिंह याची बोलतीच बंद झाली आहे. त्याला यापूर्वी ऑक्टोबर, 2022 मध्ये इन्कम टॅक्स विभागाने नोटीस पाठवली होती.
महाराणा प्रताप सिंहने या नोटीशीचा खुलासा करून घेण्यासाठी एका सीए ची मदत घेतली. तेव्हा त्यातून धक्कादायक माहिती बाहेर आली आहे. या यूट्यूबर्सचे पॅनकार्ड 7 रजिस्टर्ड कंपन्यांमध्ये लिंक असल्याचे आढळून आले आहे. यातील 5 कंपन्या दिल्लीत आणि तेलंगणा, उत्तरप्रदेशमध्ये प्रत्येकी एक कंपनी रजिस्टर्ड आहे. या यूट्यूबरला या कंपन्यांबाबत काहीच कल्पना नाही. पण त्याच्या पॅनकार्डचा वापर करून त्यावर मोठमोठे आर्थिक व्यवहार केले आहेत. त्यामुळेच त्याला इन्कम टॅक्स विभागाची नोटीस येत होती.
पॅनकार्डची झेरॉक्स देताना काळजी घ्या!
आपण अनेक ठिकाणी कोणताही अर्ज सादर करताना, कॉलेजमध्ये अॅडमिशन घेताना, नोकरीच्या ठिकाणी जॉईंट होताना आपली वैयक्तिक कागदपत्रे जमा करत असतो. ही कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने मिळवून लोकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे शक्यतो अनोळखी ठिकाणी आपली कागदपत्रे देणे टाळावेत. जिथे कागदपत्रे देणे गरजेचे आहे. तिथे त्या कागदपत्रांवर सही करून त्यावर त्या दिवसाची तारीख टाकावी. तसेच त्यावर कागदपत्र जमा करत असल्याचे कारण ही लिहावे. जेणेकरून ते कशासाठी आणि कोठे जमा केले आहे, हे कळू शकते.
सध्या अनेकजण प्रत्यक्ष कागदपत्रे जमा करण्याऐवजी जी डिजीटल स्वरूपात पाठवतात. त्यावर सही किंवा कारण लिहिण्याचा संबध येत नाही. अशावेळी आपली वैयक्तिक आणि महत्त्वाची कागदपत्रे ही सोशल प्लॅटफॉर्मवरून पाठवण्याऐवजी ती अधिकृत ई-मेलवरच पाठवावीत.
डिजीटल साक्षर असणे खूप गरजेचे
आपले काम जलदगतीने व्हावे आणि आपल्याला खूप मेहनतही करावी लागू नये, म्हणून आपण टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. पण त्या टेक्नॉलॉजीचा वापर करताना त्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे. नाहीतर आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते. यासाठी सध्याच्या काळात डिजीटल साक्षर असणे खूप गरजेचे आहे. सध्या व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमध्ये बरेच जण आपली वैयक्तिक कागदपत्रे बिनधास्त शेअर करतात.हे असे करणे चुकीचे आहे. या कागदपत्रांचा चुकीच्या पद्धतीने वापर होऊ शकतो.
Source: www.timesofindia.indiatimes.com/