प्रवाशांनी तिकिट काढले की रेल्वेला उत्पन्न मिळते आणि तिकिट रद्द केले तरी सुध्दा रेल्वेला आर्थिक लाभच होतो. कारण, यावेळी निव्वळ रद्द केलेल्या तिकिटांमुळे रेल्वे प्रशासनाला तब्बल 24 कोटींचा फायदा झाला आहे. याशिवाय रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सामान ठेवण्यास उपलब्ध करुन देण्यात आलेले लॉकर, प्लॅटफॉर्म तिकिट ते पॅंट्रीपर्यंतच्या सेवा रेल्वे देत आहेत. यामधून देखील रेल्वेला उत्पन्न मिळते. अनेकदा केवळ भंगार विकून देखील रेल्वेने कोट्यवधी रुपये मिळविले आहे.
Table of contents [Show]
इतर गोष्टींमधून होणारे उत्पन्न
यासोबतच, प्रवासी आणि मालवाहतुकीबरोबरच रेल्वे प्रशासनाकडून पुरविली जाणारी खानपान सेवा, रेल्वेस्थआनकावरील जाहिरात सेवा, विविध फूड आणि इतरही विविध स्टॉल तसेच भाडेतत्वावर गाळे उपलब्ध करुन देऊन रेल्वे प्रशासन चौफेर बाजूने होणारी कमाई आपल्या तिजोरीत साठवत आहे.
कोणकोणत्या माध्यमातून होतो नफा
प्रवाशांनी कलेले तिकिट आरक्षण, तात्काळ तिकिट आरक्षण करतांना आकारले जाणारे अतिरिक्त पैसे, प्रवाशांनी तिकिट रद्द केल्यानंतर कापली जाणारी विशिष्ट रक्कम यामधून रेल्वे प्रशासनाला प्रचंड नफा होत असतो. यावेळी निव्वळ रद्द झालेल्या तिकिटांच्या माध्यमातून रेल्वेला 24 कोटी 26 लाख रुपयांचा नफा झालेला आहे.
गेल्या आर्थिक वर्षात झालेला नफा
मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत नागपूर स्थानकावरुन विविध रेल्वे गाड्यांमध्ये 1 कोटी, 89 लाख, 14 हजार प्रवाशांनी प्रवास केला. शिवाय प्रवासाचा प्लॅन ऐनवेळी रद्द केलेल्या संबंधित प्रवाशांनी 19 लाख 93 हजार तिकिट रद्द केली . या रद्द केलेल्या तिकिटांतून रेल्वे प्रशासनाला 24 कोटी 26 लाख रुपयांचा लाभ झाला आहे.
‘ही’ योजना बंद करुन मिळविला नफा
भारतीय रेल्वे प्रशासनाने कोरोना महामारीच्या काळात बिघडलेली आर्थिक परिस्थिती रुळावर आणण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या तिकिटावरील सवलत बंद केली होती. यामुळे आर्थिक वर्षे 2022-23 मध्ये रेल्वेला 2,242 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक नफा झाला आहे. 20 मार्च 2020 ते 31 मार्च 2022 दरम्यान रेल्वेने 1500 कोटी रुपयांचा अतिरिक्त नफा मिळविला आहे. तसेच प्रत्येक वर्षी रेल्वेला भंगार विकून कोट्यवधी रुपयांची कमाई होत असते.