रिझर्व्ह बँकेने चलनातून 2000 रुपयांची नोट बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. नोटा बदलून घेण्याची प्रक्रिया बँकांमध्ये सुरु झाली आहे, मात्र एक तृतीयांश भारतीयांकडे एकही 2000 रुपयाची नोट नसल्याची माहिती एका सर्व्हेतून समोर आली आहे. सर्व्हेतील 6% नागरिकांनी त्यांच्याकडे किमान एक लाख मूल्याच्या 2000 च्या चलनी नोटा असल्याचा दावा केला आहे.
रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर मंगळवार 23 मे 2023 पासून बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची प्रोसेस सुरु झाली आहे. याशिवाय येत्या 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या नोटा चलनात वैध राहणार आहेत. आरबीआयच्या घोषणेनंतर नोटबंदीचा किती भारतीयांवर परिणाम होणार याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत होते. यावर माध्यमांमध्ये चर्चासत्रे देखील घडली.8 नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या पहिल्या नोटबंदीचा मोठा फटका भारतीयांना बसला होता. जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बहुतांश नागरिकांकडे होत्या. ज्या बदलून घेताना प्रचंड गोंधळ उडाला होता.
आता 2000 रुपयांच्या नोटबंदीबाबत कम्युनिटी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म लोकलसर्कलने नागरिकांची मते जाणून घेतली. यात 64% नागरिकांनी 2000 रुपयांची एकही नोट आपल्याकडे नसल्याचे म्हटले आहे. 6% नागरिकांनी जवळपास 100000 मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोटा असल्याचा दावा केला. लवकरच या नोटा बँकेतून बदलून घेऊ असे या नागरिकांनी म्हटले आहे.
लोकलसर्कलने भारतातील 341 जिल्ह्यांमधील 57000 नागरिकांकडून 2000 रुपयांच्या नोटेबाबत मते जाणून घेतली. या सर्व्हेत सहभागी होणारे 64% पुरुष होते तर उर्वरित महिला होत्या.
सर्व्हेत सहभागी झालेल्या 15% नागरिकांनी 20000 रुपयांपर्यंत 2000 च्या नोटा असल्याचे मान्य केले.7% नागरिकांनी 20000 ते 40000 रुपयांच्या दरम्यान 2000 रुपयांच्या नोटा असल्याचे मान्य केले. 6% नागरिकांनी त्यांच्याजवळ 40000 ते 100000 रुपयांचे चलन हे 2000 रुपयांच्या नोटमध्ये असल्याचे सांगितले.
लोकलसर्कलच्या सर्व्हेमध्ये नागरिकांनी 2000 रुपयांची नोट खर्च करताना अनेक अडचणी येत असल्याचे म्हटले आहे. 30 सप्टेंबर 2023 नंतर नोट बदलण्यासाठी मुदत वाढ देऊ नये, असेही मत काही नागरिकांनी व्यक्त केले. जवळपास 64% नागरिकांनी 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला तर 22% नागरिकांनी या निर्णयाला विरोध केला.
2000 नोटबंदीवर काय म्हणाले होते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचे कारण सांगितले होते. जेव्हा 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटा रद्द केल्या होत्या त्याबदली उच्च मूल्याच्या चलनाची गरज पूर्ण करण्यासाठी 2000 रुपयांची नोट आणण्यात आली होती. चलनातील सर्वात उच्च मूल्याच्या करन्सीचा उद्देश पूर्ण झाल्यानेच आता ती बाद करण्यात आल्याचे दास यांनी म्हटले होते. स्वच्छ चलन धोरणांतर्गत 2000 नोट चलनातून बाद करण्यात आल्याचे दास यांनी म्हटले होते.