एव्हिएशन टर्बाइन इंधनाच्या (Aviation Turbine Fuel-ATF) किमती भारतातील सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी बुधवारी दि. 1 जून रोजी 1,564 प्रति किलो लिटरने कमी केल्या आहेत. त्यामुळे आता टर्बाइन इंधनाचा प्रति किलो लीटरचा (Jet Fuel Price Per Litre) दर 1,23,039 रूपयांवरून 1,21,475 रूपयांपर्यंत खाली आला आहे.
मुंबईत सर्वांत स्वस्त तर कोलकात्यात महाग
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) कंपनीच्या म्हणण्यानुसार, 1 जून, 2022 पासून टर्बाइन इंधनाच्या किमतीत 1.3 टक्क्यांनी घट झाल्यामुळे दिल्लीमध्ये टर्बाइन इंधन 1,21,475.74 रूपये प्रति किलो लीटरने (Jet Fuel Price Per Litre) मिळत आहे. कोलकत्तामध्ये याचा दर 1,26,369.98 रूपये प्रति किलो लीटर आहे. तर मुंबईत 1,20,306.99 रुपये प्रति किलो लीटर आणि चेन्नईमध्ये 1,25,725.36 रुपये प्रति किलो लीटर आहे. दरम्यान, इंडियन ऑईल कंपनीने 16 मे, 2022 रोजी एव्हिएशन टर्बाइन इंधना (ATF) ची किंमत 5.3 टक्क्यांनी वाढवली होती.
जेट इंधनाच्या किमती या विमान कंपनीच्या एकूण खर्चातील 40 टक्के भाग असतात. या वर्षी जेट इंधनाच्या किमतींनी सलग नऊ दरवाढीनंतर नवीन उच्चांक गाठला होता. एप्रिल, 2022 मध्ये एटीएफच्या किमती 2 टक्क्यांनी वाढवून 1,12,924.83 रुपये प्रति किलो लीटर (Jet Fuel Price Per Litre) करण्यात आल्या होत्या. त्यानंतर, 1 मे रोजी त्यात 3.2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. पुन्हा 16 मे रोजी 5.3 टक्के दरवाढ करण्यात आली होती.
2022 या वर्षात आतापर्यंत टर्बाइन इंधनाच्या किमती 61.7 टक्क्यांनी वाढवण्यात आल्या होत्या. म्हणजेच इंधनाचा प्रति लीटर (Jet Fuel Price Per Litre) दर 72,062 वरून 1.23 लाख इतका झाला होता. इतक्या दरवाढीनंतर 1 जून, रोजी प्रथमच एव्हिएशन टर्बाइन इंधनाच्या किमतीत 1.3 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधनाच्या किमतीत जागतिक वाढ आणि कोविड प्रकरणांच्या नियंत्रित संख्येनंतर इंधनाच्या वाढत्या मागणीमुळे जानेवारीपासून भारतात इंधनाच्या किमतीत सतत वाढ होत होती. देशातील तेलाची गरज पूर्ण करण्यासाठी भारत 85 टक्के आयात तेलावर अवलंबून आहे.