Apple iPhone ने भारतातले पहिले स्टोअर नुकतेच सुरु केले आहे. मुंबई आणि दिल्लीतल्या स्टोअर्सच्या शुभारंभाला स्वतः ॲपल चे सीईओ टीम कुक हे हजर होते. मोठ्या उत्साहाने या स्टोअर्सचा शुभारंभ केला गेला. हाच उत्साह आता ॲपलच्या व्यवसायात देखील दिसतो आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण महिन्याभरात भारतातून ॲपलच्या निर्यातील मोठी वाढ नोंदवली गेली आहे.
ॲपलने भारतात स्टोअर सुरु केल्यानंतर स्मार्टफोनच्या निर्यातीत मोठी वाढ होईल असा अनेकांनी कयास बांधला होता. त्यांनतर आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या दोन महिन्यांत भारतातून थोडेथोडके नाही तर तब्बल 20,000 कोटी रुपयांच्या स्मार्टफोनची निर्यात नोंदवली गेली आहे. ही नोंद भारतासारख्या विकसनशील देशासाठी महत्वाची असल्याचे जाणकारांचे मत आहे. मागील आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या दोन महिन्यांतील स्मार्टफोन्सची निर्यात 9,066 कोटी रुपयांच्या आसपास नोंदवली गेली होती. यावर्षी निर्यातीत दुप्पट वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे.
Apple's iPhone exports from India touched a record high of Rs 10,000 crore in the month of May, according to the Reports.#BusinessNews #BusinessNewsUpdates pic.twitter.com/xG1uOCDs5A
— Bada Business (@BadaBusinessOff) June 21, 2023
इंडिया सेल्युलर आणि इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, एप्रिल-मे 2023 मध्ये भारतातून 20,000 कोटी रुपयांच्या वेगवगेळ्या कंपन्यांच्या स्मार्टफोनची निर्यात झाली आहे. एकट्या मे महिन्यात 12 हजार कोटी रुपयांच्या स्मार्टफोनची निर्यात नोंदवली गेली आहे. तर मे महिन्यात सर्वात जास्त कुठल्या स्मार्टफोनची निर्यात झाली असेल तर ती ॲपलच्या आयफोन स्मार्टफोनची झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार एकूण स्मार्टफोनपैकी 10,000 कोटी रुपयांचे ॲपल आयफोन निर्यात झाले आहेत.
‘मेड इन इंडिया’चा सकारात्मक प्रभाव
टक्केवारीत बोलायचे झाल्यास, गेल्या 2 महिन्यात भारतातून जितके मोबाईल निर्यात झाले आहेत त्यात 80% स्मार्टफोन्स हे ॲपलचे आहेत. आयफोन पाठोपाठ सॅमसंग कंपनीचे मोबाईल निर्यात केले गेले आहेत. असे असले तरी आजवरच्या इतिहासात आर्थिक वर्षाच्या पहिल्या 2 महिन्यात 5 अब्ज डॉलर किमतीचे मोबाईल निर्यात करण्याचा विक्रम ॲपलच्या नावे नोंदवला गेला आहे हे विशेष. भारतीय सरकारने सुरु केलेल्या PLI (Production Linked Incentive Scheme) योजनेचे हे यश आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे.
Production Linked Incentive Scheme मध्ये विदेशी कंपन्यांना भारतात उद्योग सुरु करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देते आणि आर्थिक मदत देखील देते. त्याद्वारे भारतात रोजगार निर्मिती व्हावी आणि आर्थिक सुधारणा व्हाव्यात असा सरकारचा हेतू आहे. ॲपलने भारतात मोबाईल निर्मिती सुरु केल्यामुळे भारतीय बाजारपेठेत रोजगार निर्मिती देखील झालेली पाहायला मिळते आहे.