फूड डिलिव्हरी टेक कंपनी Zomato ने देशातील 225 छोट्या शहरांमध्ये आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपला तोटा कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या एकूण ऑर्डर मूल्यामध्ये ज्या शहरांचे योगदान फक्त 0.3% राहिले, अशा शहरांत सेवा बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीला 346.6 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या शुक्रवारी, कंपनीने तिसर्या तिमाहीचे (Q3FY23) निकाल जाहीर केले आहेत.
225 शहरांमधील सेवा बंद करण्याबाबत कंपनीने सांगितले की, "गेल्या काही तिमाहीत या शहरांतील व्यवसायाची कामगिरी चांगली राहिलेली नाही." मात्र, कंपनीने ज्या शहरांची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्या शहरांची नावे अजूनही जाहीर केलेली नाहीत. त्याच वेळी, कंपनीने नफा वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दलही सांगितले आहे. झोमॅटोने माहिती दिली की ऑर्डर वारंवारता वाढवण्यासाठी त्यांनी गोल्ड सबस्क्रिप्शन सुरू केले आहे. या कार्यक्रमात 9 लाख लोक सामील झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
झोमॅटो गोल्ड योजनेचे फायदे (Benefits of Zomato Gold)
झोमॅटोने पुन्हा एकदा झोमॅटो गोल्ड प्लॅन आणला आहे. गोल्ड प्लॅन बंद करून झोमॅटोने ‘झोमॅटो प्रो’ हा प्रोग्रॅम चालवला होता, मात्र त्याला ग्राहकांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी तो बंद केला होता. आता पुन्हा झोमॅटो गोल्ड बजेट फ्रेंडली प्लॅनसह आणले आहे. मुख्य म्हणजे यंदा त्यांनी बजेट फ्रेंडली 149 चा प्लॅन त्यात सामील केला आहे. तर, ‘झोमॅटो प्रो’ सदस्यांना झोमॅटो गोल्डमध्ये एक महिन्यांपर्यंत सामील केले जाणार आहे. मात्र 999 चा प्लॅन कायम असणार, सध्या यात सवलत देण्यात आलेली आहे.
झोमॅटो गोल्ड (Zomato Gold) वापरणाऱ्यांना 10 किमीच्या परिघात अमर्यादित मोफत डिलिव्हरी मिळणार आहे, मात्र कमीत कमी 150 रुपयांच्या ऑर्डर देणाऱ्यांनाच या सेवेचा लाभ घेता येणार आहे. झोमॅटोच्या मते, झोमॅटो गोल्ड योजनेत वापरकर्त्यांना मोफत वितरण, विनाविलंब वितरणाची हमी, गर्दीच्या वेळी व्हीआयपी प्रवेश आणि इतर अनेक ऑफर्स देखील समाविष्ट आहेत. झोमाटो वापरकर्ते ज्यांच्याकडे एडिशन कार्डसह प्रो किंवा प्रो प्लस सदस्यत्व आहे, त्यांची सदस्यता 23 फेब्रुवारी 2023 पर्यंत सक्रिय राहील, त्यानंतर त्यांना तीन महिन्यांची झोमाटो गोल्ड मेंबरशिप दिली जाईल.
देशभरातील 1,000 हून अधिक शहरांमध्ये व्यवसाय
झोमॅटो हे भारतातील सर्वाधिक वापरले जाणारे अन्न वितरण ऍप्सपैकी एक आहे. गेल्या वर्षी 2021-22 मध्ये, कंपनीचा फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी व्यवसाय देशातील 1,000 हून अधिक शहरांमध्ये चालू होता. दुसरीकडे, आर्थिक वर्ष 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा तोटा 5 पटीने वाढून 343 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तथापि, महसूल वार्षिक आधारावर 1,112 कोटी रुपयांवरून 75% वाढून 1,948 कोटी रुपये झाला.
झोमॅटोची सुरुवात कशी झाली?
ही कंपनी 2008 मध्ये गुरुग्राम, हरियाणातून सुरू झाली होती. त्यावेळी या कंपनीचे नाव Zomato नसून Foodiebay होते, जे ebay या ब्रँडवरून प्रेरित होते. याची स्थापना दीपंदर गोयल आणि पंकज चढ्ढा यांनी केली होती. 2008 मध्ये झोमॅटो ही फूड डिलिव्हरी सर्व्हिस नसून रेस्टॉरंट डिस्कवरी सर्व्हिस होती, म्हणजेच तिचे काम शहरातील वेगवेगळ्या रेस्टॉरंटची माहिती देणे हे होते.
ही सेवा अतिशय यशस्वी झाली आणि 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत, Foodiebay ने 2 दशलक्ष ग्राहक आणि 8,000 रेस्टॉरंट जोडले आहेत. 2010 च्या उत्तरार्धात, कंपनीच्या संस्थापकांनी 'झोमॅटो' या नावाने सेवा देणे सुरू केले. यासोबतच कंपनीने फूड डिलिव्हरी सेवाही सुरू केली.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            