दानापूर गावातील (ता. तेल्हारा, जि. अकोला) एका 23 वर्षीय तरुण शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा आणि त्यांचा वेळही वाचावा अशा हेतूने या एका यंत्राची निर्मिती केली आहे. यातून दोन जणांना रोजगारही मिळाला आहे. काय आहे याचे वैशिष्ट्य ते जाणून घेऊया.
अजय रामकृष्ण येउल अस या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने गादीवाफा आणि मल्चिंग पेपर पसरवण्याचे यंत्र तयार केले आहे. हे तयार केलेले यंत्र बैलजोडीच्या साह्याने चालते. या यंत्राच्या माध्यमातून मल्चिंग पेपर पसरवण्यात येते. या यंत्राचा पहिला प्रयोग त्याने स्वतःच्या शेतात केला. त्यात त्याला यश मिळाले. यानंतर त्याने इतर शेतकऱ्यांच्या शेतात देखील मल्चिंग पेपर टाकण्याचे काम सुरू केले आहे. तीस एकरावर मल्चिंग पेपर पसरविण्याचे काम आतापर्यंत केले आहे. यामुळे त्याला स्वत:ला आणि अन्य दोघानाही मिळवून दिला आहे.
शेतकऱ्यांना मेहनतीच्या तुलनेत उत्पादन मिळणे आवश्यक असते. मात्र पारंपारिक शेती पध्दतीत ते फारसे साध्य होताना दिसत नाही. उलट अधिकचा खर्चही करण्याची वेळ येते. मात्र, आता शेतीत अनेक बदल होत आहेत. अजयचे काम हे त्याचेच एक उदाहरण म्हणता येईल.
पीकाबरोबर तण वाढू नये तसेच रोगराईचा प्रादुर्भाव पीकावर होऊ नये म्हणून टोमॅटो, मिरची सारख्या पिकाला संरक्षण केले जाणारे मल्चिंग आज शेती व्यवसायात महत्वाची ठरत आहेत. यातून मल्चिंग पेपरचे महत्त्व दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
मल्चिंग पेपरचा मोठ्या प्रमाणात वापर
मल्चिंग पेपरमुळं तापमान आणि आर्द्रता नियंत्रित झाल्यामुळे पीक वाढीसाठी चांगला फायदा होतो. पाऊस जास्त झाला तरी त्याचा फारसा परिणाम हा उत्पादनावर होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग मल्चिंग पेपरला अधिक प्रतिसाद देताना दिसत आहे. अकोल्यातील तेल्हारा आणि अकोट या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बागायती शेती आहे. तेल्हारा तालुक्यातल्या दानापूर गावात मोठ्या प्रमाणात मिरची आणि टोमॅटोचं उत्पादन घेण्यात येते. या कारणाने याठिकाणी मल्चिंग पेपरचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो.
शेतकऱ्यांना असा होतोय फायदा
पूर्वी मल्चिंग पेपर टाकायचं काम हाताने केलं जात असे. त्यासाठी मजुराची संख्या जास्त लागत होती. यामुळे वेळ आणि खर्चही जास्त लागत होता. यावर उपाय म्हणून अजयने हे यंत्र तयार केले आहे. या यंत्रामुळे गादीवाफासह मल्चिंग पेपर पसरवण्याचं काम अगदी सोप झालेल आहे. शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होताना दिसत आहे.
हे यंत्र टायर करण्यासाठी लोखंडी अँगल, फावडे, लोखंडी पाईप, दोन स्कूटी म्हणजे दुचाकीचे चाक, नट बोल्ड, तिफनचे दोन फाडे आणि यंत्र चालवण्यासाठी बैल जोडी याची गरज लागत आहे. यंत्र तयार करण्यासाठी पंचवीस हजार रुपये खर्च आलेला आहे. एक वर्ष इतका कालावधी हे यंत्र तयार करण्यासाठी लागला. आता मात्र हे यंत्र तयार झाल्यानंतर मल्चिंग पेपर आणि गादीवाफा तयार करणं सोपं झालेल दिसत आहे.
एका एकरासाठी मल्चिंग पेपरचे 8 बंडल लागतात. मजुराद्वारे मल्चिंग पेपर पसरवण्यासाठी प्रत्येकी बंडलप्रमाणे मजुरी द्यावी लागते. ही 500 ते 600 रुपये इतकी असते. यात वेळ लागतो. काही ठिकाणी मजूरही मिळत नाहीत. त्यामुळे मल्चिंग पेपर मजुरांच्या माध्यमातून पसरवण्यासाठी 4 हजार 500 ते 5 हजार इतकी मजुरी लागते. हेच अजयने तयार केलेल्या यंत्राच्या माध्यमातून एका बंडलला 400 रुपये याप्रमाणे एकरीनुसार 3 हजार 500 ते 4 हजार हजार इतका खर्च येतो. यात फिटिंगही चांगली येते आणि वेळेच्या बचतीचाही फायदा मिळतो. यातून अजयला चांगली कमाई मिळाली आहेच. त्याचबरोबर, अन्य दोघांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे.