येस बँक ही खासगी क्षेत्रातली एक बँक (Private sector bank) आहे. मात्र आता ती एक अग्रेसर बँक असल्याचंही दिसून येतंय. बँकेनं जाहीर केलेल्या आकडेवारीत ही बाब स्पष्ट झालीय. जानेवारी-मार्चच्या तिमाहीत येस बँकेचा (Yes Bank) नफा 202.43 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलाय. ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत नफा फक्त 51.52 कोटी रुपये होता. मागच्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेचा नफा 367.46 कोटी रुपये होता. त्यानुसार बँकेच्या नफ्यात वार्षिक आधारावर 45 टक्क्यांनी घट झालीय.
Table of contents [Show]
सलग दुसऱ्या वर्षी नफ्यात
जानेवारी-मार्च या तिमाहीत बँकेच्या नफ्यात घट झाली असली तरीही एकूण 2022-23 या वर्षात येस बँकेला मोठा नफा झाल्याचं दिसतंय. चौथ्या तिमाहीत बुडीत कर्जासाठी अधिक तरतूद केल्यामुळे नफ्यात घट झाली असल्याचं बँकेचं म्हणणं आहे. दरम्यान, वर्षभरात बँकेच्या नफ्यात वाढ झाल्याचं हे सलग दुसरं वर्ष आहे.
उत्पन्नही वाढलं
बँकेच्या नफ्याची आकडेवारी तर पाहिली. मात्र या नफ्याबरोबरच बँकेचं उत्पन्नही वाढलंय. चौथ्या तिमाहीत बँकेचं एकूण उत्पन्न 7,298.51 कोटी रुपये आहे. तर आर्थिक वर्ष 2021-22च्या याच तिमाहीत बँकेचं उत्पन्न 5,829.22 कोटी रुपये होतं. 2022-23 या आर्थिक वर्षात बँकेचं एकूण उत्पन्न 26,624.08 कोटी रुपये होतं. 2021-22मध्ये एकूण उत्पन्न 22,285.98 कोटी रुपये इतकं होतं.
शेअरहोल्डर्सची संख्या अधिक
ग्राहकसंख्या किती यावर एखाद्या व्यवसायाचा नफा-तोटा अवलंबून असतो. येस बँकेच्या बाबतीत काहीशी वेगळी परिस्थिती आहे. बँकेशी संबंधित एक खास गोष्ट म्हणजे सध्या तिच्या शेअरहोल्डर्सची संख्या ही डेबिट कार्ड असलेल्या ग्राहकांच्या संख्येपेक्षा जास्त झालीय. बँकेनं नुकतीच आकडेवारी जाहीर केलीय. या ताज्या आकडेवारीनुसार, 2022-23च्या शेवटी तिच्या शेअरधारकांची संख्या 50.57 लाखांवर पोहोचलीय. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस बँकेच्या अॅक्टिव्ह डेबिट कार्ड होल्डर्सची संख्या 44.26 लाख झालीय. म्हणजेच बँकेच्या शेअरहोल्डर्सची संख्या डेबिट कार्डहोल्डर्सपेक्षा 6.31 लाख जास्त आहे.
काही प्रभावशाली खासगी बँका
मागच्या आर्थिक वर्षातला एकूण आढावा घेतला तर खासगी क्षेत्रातल्या काही बँकांची कामगिरी चांगली असल्याचं पाहायला मिळालं. अॅक्सिस बँख, आयसीआयसीआय, एचडीएफसी, कोटक महिंद्रा, एयू बँक अशा विविध बँकांनी नफा कमावला आहे. एचडीएफसी तर एलिट ग्रुपमध्ये (ज्यांचं मार्केट कॅप 5 लाख कोटींच्या पुढे आहे) जाऊन बसली आहे. येस बँक आपल्या नफ्यात वाढ करून एक एक पायरी पुढे जात असल्याचं यावरून दिसून येतंय.