येस बँक आता बचत खात्यावर 3.50 टक्के ते 7 टक्के व्याज देत आहे. बँकेच्या वेबसाईटनुसार हे व्याजदर 21 ऑगस्ट 2023 पासून स्थानिक आणि देशाबाहेर राहणाऱ्या नागरिकांच्या बचत खात्यांवर लागू आहेत. बचत खात्यांवरील व्याज दैनिक आधारावर मोजले जाणार असून तिमाहीत खात्यावर जमा होणार आहे.
बँकेचे नवीन व्याजदर
बँकेच्या वेबसाईटनुसार, बँक सध्या 1 लाख रुपयांपर्यंतच्या दैनिक बॅलन्सवर 3.5 टक्के ऑफर देत आहे. तर 1 लाख ते 5 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या दैनिक बॅलन्सवर बँक 4.25 टक्के व्याज देत आहे. तसेच, 5 लाखापेंक्षा अधिक 10 लाख रुपयांपर्यंतच्या बॅलन्सवर बँक 5 टक्के व्याज देत आहे. बँक 10 लाखांपेक्षा अधिक आणि 5 कोटी रुपयांपर्यंतच्या बॅलन्सवर 7 टक्के व्याज देत आहे. याशिवाय 5 कोटी आणि 25 कोटींपेक्षा कमी रकमेवर बँक 6 टक्के व्याज देत आहे. त्यामुळे नागरिकांनी पैसा बँकेत ठेवल्यास, त्यांना बराच फायदा होऊ शकतो. कारण, हे व्याज दैनिक आधारावर मोजले जाणार आहेत.
एफडीच्या दरातही केला बदल
येस बँकेने याआधीच म्हणजे 28 जुलै 2023 ला 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीच्या व्याजदरात बदल केले होते. त्यानुसार बँक एफडीवर सामान्य नागरिकांना 3.25 टक्के ते 7.75 टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 18 महिने ते 36 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या एफडीवर सर्वाधिक म्हणजेच 8.25 टक्के व्याजदर देते. त्यामुळे आकडेवारीवरुन सामान्य नागरिकांपेक्षा जास्त व्याजदर ज्येष्ठ नागरिकांना मिळत असल्याचे दिसून येत आहे.
ज्येष्ठ नागरिकांना सवलत
याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी अजून एक जमेची गोष्ट आहे. ती म्हणजे त्यांनी त्यांची एफडी मुदती आधी तोडली तरी त्यांना कोणताही दंड द्यावा लागणार नाही. तेच सामान्य नागरिकांनी 5 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेची एफडी मुदतीआधीच तोडल्यास त्यांना दंड द्यावा लागणार आहे. यासाठी बँकेने दंड ठरवून दिला आहे. तसेच, तुम्हाला एफडी उघडायची असल्यास, तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन किंवा ऑनलाईन उघडू शकणार आहात.