खनिजतेल, धातू, रसायने आणि कपडे यांच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे जुलै महन्यात घाऊक बाजारातील महागाई कमी झाली आहे. केंद्र सरकारने जुलै 2023 मधील घाऊक किंमतींवर आधारित महागाईचा दर आज जाहीर केला. त्यानुसार जुलैमधील महागाई दर उणे 1.36% इतका आहे. जून महिन्यात तो उणे 4.12% इतका होता.
वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात कपडे, रसायने आणि रासायनिक उत्पादने, धातू आणि खनिज तेलाच्या किंमतीत घसरण झाली. जुलै 2022मध्ये महागाई दर 1.95% इतका होता. एप्रिल 2023 पासून घाऊक महागाईचा दर उणे पातळीवर असल्याने सरकारला दिलासा मिळाला आहे.
प्राथमिक वस्तूंचा महागाई निर्देशांक 8.05% नी वाढला असून तो 1.5% इतका आहे. इंधन आणि वीजेमधील महागाई 0.48% ने कमी झाली असून जुलै महिन्यात तो 145.3 इतका खाली आला. कारखाना उत्पादित वस्तूंचा महागाई दर 0.29% ने कमी झाला असून तो 139.6 इतका आहे.
मॉन्सूनने जून आणि जुलै या दोन महिन्यात समाधानकारक कामगिरी केली. यामुळे कृषि क्षेत्राला संजीवनी मिळाली आहे. खरिप हंगामात चांगले उत्पादन होण्याची शक्यता असल्याने भाजीपाल्याच्या किंमती नजिकच्या काळात कमी होतील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले. यात बँकेने रेपो दर स्थिर ठेवला. सध्याची महागाई ही तात्पुरती असून ती कमी होईल, असा आशावाद बँकेने व्यक्त केला आहे.
जुलै महिन्यात खाद्य वस्तू महागल्या
जुलै महिन्यात खाद्य वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. जून महिन्यात खाद्य वस्तूंचा महागाई दर उणे 1.24% इतका होता. तो जुलैमध्ये थेट 7.75% इतका वाढला आहे. तांदूळ, डाळी, तृणधान्ये, भाजीपाला, कांदे, बटाटे, टोमॅटो, फळे, दूध, अंडी, मटण आणि मच्छी यांचे दर वाढल्याची नोंद झाली.