Davos | डिजिटायझेशनच्या (Digitization) या युगात आज मोबाईल आणि इंटरनेट हे सर्वसामान्यांच्या जीवनातील अत्यावश्यक बाब बनली आहे. एक एक करून सर्व योजना, सर्व कामकाज पेपरलेस (Paperless) आणि ऑनलाइन (Online) होत आहे. सामान्य माणसाला मोबाईल आणि इंटरनेटचे महत्त्व जितके कळते आणि समजते त्यापेक्षा जास्त काळजी सरकारी आणि वित्तीय संस्थां घेत असतात. मोबाइल आणि इंटरनेटचे महत्त्व अधोरेखित करताना, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी गुरुवारी सांगितले की, मोबाइल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे भारताला आर्थिक समावेशन विस्तारण्यात खूप मदत झाली आहे. यासोबतच, ते असेही म्हणाले की, बँक मित्रांपासून (Banking Mitra) ते मायक्रो एटीएमपर्यंतच्या (Micro ATM) विस्तृत नेटवर्कमुळे बँकिंग सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची खात्री झाली आहे.
भारतात डिजिटल साक्षरतेचे प्रयत्न जोरात!
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (WEF) आर्थिक समावेशावरील सत्राला संबोधित करताना, SBI प्रमुख दिनेश खारा म्हणाले की, भारतात आर्थिक आणि डिजिटल साक्षरता पसरवण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत. या मुळे सामान्य ग्राहकांना त्यांच्या बँकिंग गरजा पूर्ण करण्यास मदत मिळते आहे. सोबतच बँकिंक सेवा घेणाऱ्या ग्राहकांची कोणत्याही प्रकारे फसवणुकी होणार नाही याची देखील खात्री सरकारी स्तरावर घेतली जात आहे. खारा पुढे म्हणाले की, भारत हा सुमारे 1.3 अब्ज लोकसंख्या असलेला देश आहे आणि देशात सुमारे 1.2 अब्ज मोबाइल फोन कनेक्शन आहेत. भारतात जवळपास 800 दशलक्ष इंटरनेट कनेक्शन्स आहेत आणि यामुळे भारताला आर्थिक विषयांत सामान्य नागरिकांचा समावेश वाढवण्यात खूप मदत झाली आहे.
धान्य वितरणाद्वारे महागाई नियंत्रणात
SBI प्रमुख खारा पुढे म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात भारताने आणखी एक उत्तम काम केले. नागरिकांना फक्त रोख रक्कम वाटण्याऐवजी अन्नधान्यही पुरवले जात आहे. त्यामुळे महागाई नियंत्रणात आणण्यास मदत झाली. ते म्हणाले की एसबीआय आणि इतर बँकांनी डिजिटल बँकिंगची एक मजबूत प्रणाली तयार केली आहे, जी लोकांच्या तात्काळ बँकिंग गरजा विनाविलंब पूर्ण करण्यात मदत करते.