• 27 Sep, 2023 00:34

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

वर्ल्ड डे अगेन्स्ट चाईल्ड लेबर 2022 : बालमजुरीच्या जीवावर कोट्यवधी रूपयांची उलाढाल

वर्ल्ड डे अगेन्स्ट चाईल्ड लेबर 2022 : बालमजुरीच्या जीवावर कोट्यवधी रूपयांची उलाढाल

World Day Against Child Labour 2022: दरवर्षी 12 जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने जगभरात सुरू असलेली बेकायदेशीर बालमजुरी बंद करण्याचे आवाहन केले जाते.

World Day Against Child Labour 2022 : दरवर्षी संपूर्ण जगभरात 12 जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने जगभरात सुरू असलेली बेकायदेशीर बालमजुरी (Child Labour) बंद करण्याचे आवाहन केले जाते. अनेक देशांची सरकारे, स्वयंसेवी संस्था आणि प्रत्यक्ष समाज या विरोधात काम करत आहे; तरी ही समस्या अद्याप संपलेली नाही. 14 वर्षांखालील मुलांची बालमजुरी संपवून, त्यांना त्यांच्या शिक्षणाचा हक्क (Right to Education) मिळवून देणं, हा या दिवसाचा व चळवळीचा मुख्य उद्देश आहे. 

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेसह (International Labour Organization), देश-विदेशातील अनेक संघटना बालकामगारांच्या विरोधात आवाज उठवत काम करत आहे. जगभरात या चळवळीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) 2002 पासून 12 जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिन (World Day Against Child Labour) साजरा करत आहे. 

बालमजुरी नष्ट करण्यासाठी हवं सार्वत्रिक सामाजिक संरक्षण!

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेकडून (आयएलओ) हा दिवस साजरा करताना दरवर्षी एक थीम तयार केली जाते. गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयएलओ (ILO)ने 'कोरोना व्हायरसपासून बालकांचे संरक्षण' (Protection from Corona Virus) ही थीम राबवली होती. तर यावर्षी म्हणजे 2022 साठी ‘बालमजुरी समूळ नष्ट करण्यासाठी सार्वत्रिक सामाजिक संरक्षण (Universal Social Protection to End Child Labour)’ ही थीम राबवली जाणार आहे. याबाबत आयएलओ संघटनेने ‘The role of Social Protection in the elimination of child labour’ अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, सर्व मुलांना सामाजिक संरक्षणाचा आनंद घेता यावा यासाठी जगभरातून फारच कमी प्रमाणात प्रयत्न झाले आहेत. 


अजूनही जगभरातील 0 ते 14 वयोगटातील 1.5 अब्ज मुलांना (एकूण 73.6 टक्के) कुटुंबाचे किंवा बालक असण्याचे लाभ मिळत नाहीत.  या अहवालात म्हटल्याप्रमाणे 5 ते 17 वयोगटातील 10 पैकी 1 मुलगा अजूनही बालमजुरीमध्ये (Child Labour) गुंतलेला आहे. कोविडच्यापूर्वीपासून ही संख्या अद्यापही कमी झालेली नाही. उलट वाढते दारिद्र्य, बेरोजगारीमुळे 2022 च्या वर्षा अखेरीपर्यंत बालमजुरांची संख्या 8.9 दशलक्षाने वाढू शकते, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.

लघुउद्योगाच्या माध्यमातून हजारो बालके बालमजुरीच्या विळख्यात 

सध्याच्या घडीला अनौपचारिकरीत्या देशातील हजारो बालके विविध हॉटेल्स, घरगुती व्यवसाय आणि लहान कारखान्यांमधून काम करत आपले बालपण घालवत आहेत. बालमजुरी (Child Labour) हा काही व्यावसायिकांसाठी नफ्याचा व्यवसाय आहे. कमीतकमी मजुरी देऊन लहान मुलांचे शोषण करून त्यांच्या जीवावर काही व्यावसायिक कोट्यवधी रूपये कमवत आहेत. भारताच्या उत्तरेकडील मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांमधून नक्षीकाम, कापडावरील कारागिरीसाठी बालमजुरांचा मोठ्या प्रमाणात वापर करून घेतला जातो. तर दक्षिणेकडील तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये फटाक्यांच्या निर्मितीसाठी महिला व बालमजुरांचा वापर केला जातो. तसेच सोन्या-चांदीच्या वस्तू वितळवून देणाऱ्या व्यवसायासाठी लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. महाराष्ट्र आणि मुंबईतही ज्वेलरी मेकिंग आणि पॉलिश, बीडी उद्योग, हस्तकला, नारळ फायबर, भरतकाम-विणकाम आदी व्यवसायातून बालकामगार मोठ्या संख्येने काम करत आहेत. 

मुलांच्या हक्कांवर आणि आरोग्यावर घातक परिणाम

  1. जगभरात बालमजुरी करणाऱ्या 160 दशलक्ष मुलांपैकी 75 दशलक्ष मुले धोकादायक व घातक कामे करतात.
  2. धोकादायक व घातक कामांमध्ये हाताने साफसफाई, बांधकाम, शेती, खाणी, लहान व घरगुती कारखाने आदींचा समावेश होतो.
  3. लहान वयात काम केल्याने अनेक रोगांची लागण होण्याची शक्यता असते. परिणामी मुलांची शारीरिक वाढ खुंटते.
  4. बालमजुरीमुळे अनेक मुलांना शाळेत जाता येत नाही. तर काही मुलांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते.

बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986

महाराष्ट्राच्या बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 नुसार 14 वर्षांखालील मुलांना कामावर ठेवणे गुन्हा आहे. या कायद्यांतर्गत, 14 वर्षाखालील मुलांना धोकादायक उद्योगधंदे व हानिकारक प्रक्रिया राबवणाऱ्या प्रकल्पांमध्ये कामावर ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले. मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यास हानिकारक मानले गेलेले 16 व्यवसाय व धोकादायक समजल्या गेलेल्या 65 प्रकल्पांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास कायद्याने मनाई करण्यात आली आहे.

World Day Against Child Labour 2022

‘महामनी’चे आवाहन

बालकामगारांची समस्या आपल्या समाजातून समूळ नष्ट करायची असेल तर संपूर्ण समाजाला या समस्येविरोधात एकजुटीने विरोध करण्याची आवश्यकता आहे. एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून, जिथे तुम्हाला 14 वर्षांखालील मुले काम करताना दिसत असतील तर ती सेवा नाकारून तुम्ही बालकामगार विरोधी चळवळीला पाठबळ देऊ शकता.