बंगळुरूमध्ये एका IT कंपनीमध्ये (IT Company) नोकरी करणारा पुण्यातला एक तरुण ऑनलाइन फ्रॉडला (Online Fraud) बळी पडला आहे. आयटी कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी असूनही जास्तीचे पैसे मिळवण्याच्या मोहापायी या तरुणाचं मोठं नुकसान झालं आहे. एका ऑनलाइन पार्ट टाइम कामाच्या जाळ्यात अडकून एक - दोन लाख नव्हे तर तब्बल 12.85 लाखाचं नुकसान करुन घेतलं आहे.
नेमकं काय घडलं
संजय दशरथ अमृतकर हा पुण्यातील व्यक्ती. बंगळुरूमधल्या एका आयटी कंपनीमध्ये तो काम करतो. सध्या पुण्यातून त्याचं वर्क फ्रॉम होम सुरू होतं. त्याला मोबाईलवर ऑनलाइन कामाची ऑफर आली. कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या गूगल पोस्टवर सकारात्मक प्रतिक्रया पोस्ट करणं असं या नवीन कामाचं स्वरूप होतं. या कामाचे त्याला खूप जास्त पैसे ऑफर करण्यात आले. मेसेज पाहून संजय अमृतकर यांनी त्यावर क्लिक केलं आणि पुढचं संभाषण सुरू केलं. त्यानंतर संजय अमृतकरला गूगलवरच्या प्रत्येक सकारात्मक प्रतिक्रियेवर (Google Review) 150 रूपये मिळू लागले.
कालांतराने या ऑनलाइन कंपनीच्या कथित प्रतिनिधीने संजय अमृतकरला फोन केला. त्याच्या कामाचं कौतुक करत त्याला आणखी पैसे मिळवायचे असतील तर पेड टास्कमध्ये भाग घ्यावा लागेल असं संजयला सांगितलं आणि फसवणुकीला सुरूवात झाली.
काय होता Google Reviewed Paid Task
या ऑनलाइन फ्रॉड कंपनीच्या व्यक्तिने संजय अमृतकर याला सांगितले की, यापुढील काही टास्क हे पेड टास्क स्वरूपाचे असतील. ज्यामध्ये तुम्हाला जास्त पैसे कमावता येतील. यामध्ये तुम्हाला टास्क मिळवण्यासाठी काही पैसे भरावे लागतील. टास्क पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमचे पैसे आणि टास्कचे पैसे सुध्दा परत मिळतील. संजयने त्या व्यक्तिने सांगितलेल्या पाच वेगवेगळ्या खात्यावर 12.85 लाख रूपये डिपॉझिट केले.
थोड्याच दिवसात संजयला कळून चुकलं की आपली फसवणूक झालीये. आपल्याला जे टास्क दिले जातायेत ते आणि टास्क देणारी कंपनीही फसवी असल्याची जाणिव त्याला झाली. त्यांने लागलीच त्या प्रतिनिधीच्या नंबरवर फोन केला. मात्र, त्यांनी पैसे परत द्यायला स्पष्ट नकार दिला. मग संजयने स्थानिक वाकड पोलिस स्थानकांमध्ये तक्रार नोंदवली.
सायबर पोलिस सेलमार्फेत या घटनेचा तपास सुरू आहे. आरोपीवर आयपीसी आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्यातील कलमां अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ऑनलाईन फ्रॉडचं पेव
थोड्या दिवसापूर्वीच पुण्यातील एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची ‘मनी फॉर लाईक्स’ या ऑनलाईन फ्रॉडमध्ये कोट्यावधीची फसवणूक झाल्याची घटना समोर आलेली. त्यानंतर लागलीच ‘गूगल रिव्युव्ह’ हा फ्रॉड समोर येत आहे. हे दोन्ही फ्रॉड सारखेच आहेत. यामध्ये ग्राहकांना पहिले काही फ्री टास्क देऊन त्यांना जास्त पैसे दिले जातात. त्यानंतर पेड टास्कच्या निमित्ताने लाखो, कोट्यावधी रूपयाचा गंडा घातला जातो.