महाराष्ट्राची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीला 1 जून 2023 रोजी 75 वर्ष पूर्ण झाली.1 जून 1948 रोजी पुणे ते अहमदनगर मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस धावली होती. राज्याच्या गावोगावी पोहचणाऱ्या एसटीची देखभाल दुरुस्ती करण्यात आता पुरुष मॅकेनिक बरोबरच महिलासुद्धा जबाबदारी पार पाडत आहेत. नागपूरच्या गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानकात लाल परीची देखभाल दुरुस्तीची धुरा चैताली पित्तुले आणि रुपाली पोहाणे या दोघी महिला मॅकेनिक समर्थपणे सांभाळत आहे. भंडारा जिल्ह्यातील पहिल्या महिला मॅकेनिक असलेल्या चैताली पित्तुले यांनी आजवर शेकडो एसटी दुरुस्त केल्या आहेत.
आर.सी मेकॅनिक चैताली पित्तुले
मूळच्या भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील राहणाऱ्या चैताली उमेश पित्तुले यांनी 12 वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ITI पूर्ण केले. पुढे एसटी महामंडळात नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना भंडारा आगारात टेक्निशियनची नोकरी लागली. त्या भंडारा जिल्ह्यातील पहिल्या महिला मॅकेनिक आहेत. 2008 मध्ये चैताली यांची बदली गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानकात झाली. तेव्हापासून त्या या ठिकाणी आर.सी मॅकेनिक म्हणून कार्यरत आहेत. चैताली या नागपूर येथील न्यू-सुभेदार ले- आऊट भागात कुटुंबासोबत राहतात.
टेक्निशियन रुपाली पोहाणे
चैताली यांच्या सोबतच रुपाली पोहाणे या देखील गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानकात टेक्निशियन आहे. त्या 2013 साली रामटेक आगारात रुजू झाल्या होत्या. लग्नानंतर त्यांची बदली गणेशपेठ आगारात झाली. सुरुवातीला हे काम करणे फार अवघड वाटत होते. मात्र हळूहळू या कामाची सवय झाली असल्याचे रुपाली सांगतात. रुपाली यांनी एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेतल्यानंतर आयटीआय केले होते. त्यानंतर त्या या कामावर रुजू झाल्या होत्या. रुपाली या देखील नागपूरातच कुटुंबासोबत राहतात. चैताली आणि रुपाली या दोघींनीपण हे काम आता आम्हाला अगदी सहज जमत असल्याचे सांगितले.
दररोज दोन ते तीन बसेसची दुरुस्ती
वाहन दुरुस्तीसाठी लागणारे मोठ्या आकाराचे पाने आणि जॅकच्या मदतीने बसची चाके, टायर, सिलेंडर हेड बदलविणे. गिअर बॉक्स, क्लच प्लेट, इंजिन दुरुस्त करणे, ग्रीसिंग करणे यासारखी कामे देखील चैताली सहज पार पाडतात. चैताली आणि त्यांच्या सोबत असलेली एक महिला सहकारी रुपाली पोहणे असून या दोघी मिळून आगारात दोन ते तीन बस दुरुस्त करतात.